महेंद्रसिंह धोनी भारतीय संघात खेळत नसताना, मर्यादीत षटकांच्या सामन्यात उप-कर्णधार रोहित शर्माच्या खांद्यावर आता मोठी जबाबदारी येणार आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत ३ विजेतेपद मिळवली आहेत. विराटच्या अनुपस्थितीत रोहितने भारतीय संघाचं नेतृत्व करत आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपलं नेतृत्व सिद्ध केलं आहे. यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली रोहितने संघातील तरुण खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं आणि मार्गदर्शन करण्याचं काम करावं अशी अपेक्षा करत आहेत.

“मैदानात काहीवेळा झटपट निर्णय घेण्याची आवश्यकता असते. रोहितने अशावेळी तरुण खेळाडूंशी बोलून, चर्चा करुन त्यांना मदत करावी अशी अपेक्षा आहे. संघामध्ये तुम्हाला समतोल राखायचा असतो. कर्णधाराला मदतीसाठी एका सिनीअर खेळाडूची गरज असते. धोनी संघात असताना कोहली आणि धोनी हे तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करायचे. सध्या धोनी भारतीय संघात नसल्यामुळे रोहितने आपल्या अनुभवाचा फायदा संघातील तरुण खेळाडूंना करुन द्यावा असं सर्वांचं मत पडलं आहे.” संघ व्यवस्थापनातील सुत्राने IANS वृत्तसंस्थेशी बोलताना माहिती दिली.

अवश्य वाचा – Ind vs SA : भारताला धक्का,जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे संघाबाहेर; उमेश यादवला संधी

रोहितने याआधी भारतीय संघाचं नेतृत्व केलं आहे. तो पहिल्यांदा खेळाडूंना मार्गदर्शन करतोय अशातला भाग नाहीये. कर्णधार आणि प्रशिक्षकांचा रोहितच्या अनुभवावर विश्वास आहे, त्यामुळो रोहितसारख्या अनुभवी खेळाडूने प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाविरोधात गोलंदाजांना मार्गदर्शन करणं हे केव्हाही संघासाठी फायदेशीर ठरु शकतं. संघ व्यवस्थापनातील सुत्राने बाजू मांडली. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेत रोहितला फलंदाजीत फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. यानंतर २ ऑक्टोबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतही रोहित शर्मा सलामीला फलंदाजीला येणार आहे. त्यामुळे आगामी सामन्यांमध्ये रोहित शर्माच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.