छोटय़ा भावासमान असणाऱ्या फिलीप ह्य़ुजच्या अकाली निधनाने झालेले दु:ख बाजूला ठेवून पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे यशस्वी नेतृत्व करणाऱ्या मायकेल क्लार्कची कारकीर्द दुखापतीमुळे संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. प्रदीर्घ काळाचे पाठीचे दुखणे आणि नव्याने उद्भवलेली मांडीच्या स्नायूंची दुखापत यामुळे मी कदाचित पुन्हा ऑस्ट्रेलियासाठी खेळणार नाही असे म्हणणे क्लार्कला भाग पडले. तूर्तास तरी क्लार्कने भारताविरुद्धच्या उर्वरित सामन्यातून माघार घेतली आहे. मात्र क्लार्कचे उद्गार ऑस्ट्रेलियासाठी धोक्याचा इशारा असून, नव्या कर्णधारासह त्यांना संघबांधणी करावी लागणार आहे.   
पाठीच्या दुखण्यामुळे क्लार्क भारताविरुद्धची पहिली कसोटी खेळणार नव्हता. मात्र ह्य़ुजच्या निधनामुळे पहिल्या कसोटीच्या तारख्या बदलल्या. मात्र त्याकाळात ह्य़ुजच्या निधनामुळे क्लार्कवर दु:खाचा डोंगर कोसळला. मात्र यातून क्लार्कने स्वत:ला आणि सहकाऱ्यांना सावरले. पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही क्लार्कने पहिली कसोटी खेळण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ६० धावांवर खेळताना क्लार्कचे पाठीचे दुखणे बळावले. दुखण्याचे स्वरूप गंभीर असल्याने त्याने निवृत्त होण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी पाठीचे दुखणे घेऊन तौ मैदानात उतरला आणि त्याने शानदार शतक झळकावले. मात्र त्याला होणारा त्रास स्पष्ट जाणवत होता. भारताच्या दुसऱ्या डावात क्लार्कला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. पाठीचे दुखणे आणि मांडीच्या स्नायूंवरची क्ष-चाचणीनुसार दुखापत बरी होण्यास वेळ आवश्यक असल्याने क्लार्कला माघारीचा निर्णय घ्यावा लागला.
क्लार्क म्हणाला, ‘‘ह्य़ुजच्या निधनानंतरची पहिली कसोटी आमच्यासाठी विशेष महत्त्वाची होती. हा विजय आमच्यासाठी संस्मरणीय आहे. माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा सामना असून त्यात खेळणे मानसिकदृष्टय़ा आव्हानात्मक होते.’’

वैद्यकीय तज्ज्ञ क्ष-किरण चाचणी अहवालाचे परीक्षण करत आहेत. विश्वचषकासाठी पुनरागमन करण्याचा माझा विचार आहे. विश्वचषकासाठीचा सराव सामना आठ आठवडे दूर आहे. मात्र दुखापतीतून सावरण्यासाठी किती वेळ लागेल याची शाश्वती नाही. त्यामुळे मी कदाचित ऑस्ट्रेलियासाठी पुन्हा खेळू शकणार नाही
– मायकेल क्लार्क

सकाळी मैदानात उतरण्यापूर्वी जिंकण्यासाठी खेळण्याचे सहकाऱ्यांना सांगितले. सामना अनिर्णित राखण्यात काहीच अर्थ नव्हता. लक्ष्य मोठे असल्याने मोठे फटके खेळणे आवश्यक होते. आम्ही हे लक्ष्य गाठण्याच्या दृष्टीने सर्वोत्तम प्रयत्न केला, त्यामुळे संघाच्या कामगिरीचा पश्चाताप नसून अभिमान आहे. मी आणि मुरली विजय आणखी ४० धावा जोडू शकलो असतो तर चित्र वेगळे दिसले असते. वैयक्तिक पराक्रमांपेक्षा संघाच्या विजयाचा मी विचार करत होतो. नॅथन लिऑनच्या गोलंदाजीत परिपक्वता आली आहे. त्याने अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली. त्यामुळेच त्याला विकेट्स मिळाल्या. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी मिळालेल्या संधींचा पुरेपूर उपयोग केला. मात्र सुरेख खेळासाठी हा सामना स्मरणात राहील.
विराट कोहली, भारताचा कर्णधार