आयपीएल स्पर्धेतील कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी भारतीय संघाचा माजी गोलंदाज लक्ष्मीपती बालाची याची निवड करण्यात आली. पाकिस्तानचे माजी गोलंदाज वसीम अक्रम यांची जागा बालाजी घेणार आहे. वसीम अक्रम सध्या आपल्या वैयक्तिक कार्यक्रमांत व्यग्र असल्यामुळे त्यांनी प्रशिक्षकपदावरून माघार घेतली. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्सच्या गोलंदाजी प्रशिक्षकाचे पद रिक्त झाले होते. त्यानंतर बुधवारी संघाच्या व्यवस्थापनाकडून संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदासाठी बालाजीची नियुक्ती करण्यात आली. कोलकाताने २०१० साली वसीम अक्रम यांची संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड केली होती. अक्रम यांच्या कार्यकाळात कोलकाताने २०१२ आणि २०१४ असे दोन वेळा स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. कोलकाता संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर बालाजी म्हणाला की, कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळताना मी खूप आनंद लुटला. त्यामुळे पुन्हा एकदा त्याच संघाचा एक भाग होणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे.
बालाजी २०१२ साली विजेत्या संघात सहभागी खेळाडू होता. बालाजीने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात प्रथम श्रेणी क्रिकेटला अलविदा केले होते. बालाजीने आपल्या आंतररष्ट्रीय करिअरमध्ये ८ कसोटी, ३० एकदिवसीय आणि पाच ट्वेन्टी-२० सामने खेळले आहेत. तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०६ सामन्यांत १२.१४ च्या सरासरीने १२०२ धावा आणि २६.१० च्या सरासरीने ३३० विकेट्स घेतल्या आहेत. २००४ साली पाकिस्तान दौऱयावर बालाजीने जबरदस्त कामगिरी केली होती. बालाजीच्या उल्लेखनीय कामगिरीच्या जोरावर पहिल्यांदाच भारताला पाकिस्तानात कसोटी मालिका जिंकता आली होती.