भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेदरम्यान विंडीजच्या शेमरॉन हेटमायरने आपल्या धडाकेबाज फलंदाजीचं प्रदर्शन घडवलं. पहिल्या वन-डे सामन्यात हेटमायरच्या शतकी खेळाच्या जोरावर विंडीजने भारतावर मात केली. त्याच्या याच आक्रमक खेळीचा हेटमायरला आयपीएल लिलावामध्ये फायदा झाला आहे. तेराव्या हंगामासाठीच्या लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने हेटमायरवर ७ कोटी ७५ लाखांची बोली लावत त्याला आपल्या संघात दाखल करुन घेतलं.

आपल्यावर लावलेली बोलीची बातमी समजल्यानंतर हेटमायरने, हॉटेलमधल्या रुमवर खास आपल्या शैलीत भन्नाट डान्स केला. त्याच्या या डान्सचा व्हिडीओ दिल्ली कॅपिटल्स संघाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे.

दरम्यान भारत विरुद्ध विंडीज यांच्यातली वन-डे सामन्यांची मालिका सध्या १-१ ने बरोबरीत असून रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात या मालिकेचा निकाल लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात विंडीजचे फलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.