वानखेडे स्टेडियमच्या बालेकिल्ल्यावर मुंबई इंडियन्सने १५ धावांनी रुबाबात विजय मिळवला. ३३ चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांसह ५६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी साकारणारा माइक हसी मुंबई इंडियन्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. मुंबई इंडियन्सच्या या विजयामुळे त्यांच्या खात्यावर १२ गुण जमा झाले असले तरी त्यांचे भवितव्य मात्र अधांतरी आहे.
मागील सामन्यात यंदाच्या आयपीएलमधील पहिलेवहिले शतक झळकावणाऱ्या लेंडल सिमन्सने (३५) हसीच्या साथीने ८७ धावांची दमदार सलामी नोंदवली. मग हसीने रोहित शर्मा (३०) दुसऱ्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी रचली. २ बाद १४० अशा सुस्थितीनंतर मुंबई इंडियन्सचा डाव ढासळायला प्रारंभ झाला आणि अखेरच्या षटकात १७३ धावांवर त्यांच्या डावाला पूर्णविराम मिळाला. ३३ धावांत मुंबईचे तळाचे आठ फलंदाज बाद झाले.
दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून जे पी डय़ुमिनी, केव्हिन पीटरसन आणि मनोज तिवारी यांनी धावांची चाळिशी ओलांडली. परंतु दिल्लीकडे पुरेशी फलंदाजीची कुवत असतानाही त्यांना विजयाचे आव्हान पेलता आले नाही.
संक्षिप्त धावफलक
मुंबई इंडियन्स : १९.३ षटकांत सर्व बाद १७३ (लेंडल सिमॉन्स ३५, माइक हसी ५६, रोहित शर्मा ३०; इम्रान ताहीर ३/३७, जयदेव उनाडकट २/२४) विजयी वि. दिल्ली डेअरडेव्हिल्स : २० षटकांत ४ बाद १५८ (जे पी डय़ुमिनी नाबाद ४५, केव्हिन पीटरसन ४४, र्मचट लांगे २/३२)     
सामनावीर : माइक हसी.