एखादा सामना रंगात असताना मैदानावर जशी चुरस पाहायला मिळते. अगदी त्याप्रमाणे इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) खेळाडूंच्या लिलाव प्रक्रियेत चुरस पाहायला मिळाली. आपल्या अष्टपैलू कामगिरीने मैदान दणाणून सोडणाऱ्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सने या लिलाव प्रक्रियेतही सर्व संघ मालकांना आपल्या मागे पळण्यास भाग पाडले. अखेर तो पुणे सुपरजायंटच्या हाती साडेचौदा कोटी रूपयांना लागला. अंबानींच्या मुंबई इंडियन्सला तर बेन स्टोक्सला घ्यायची इतकी घाई होती की, त्यांनी चक्क स्टोक्सची बोली सुरू व्हायच्या आधीच त्याला आपल्याकडे घेण्यासाठी हात वर करून ठेवला होता. स्टोक्सची बेस प्राइस २ कोटी ठेवण्यात आली होती. एका खेळाडूची लिलाव प्रक्रिया संपत आली होती. स्टोक्सचा लिलाव सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी करण्यासाठी आपला हात वर केला.
मुंबई इंडियन्सने स्टोक्सला घेण्यासाठी दाखवलेली उत्सुकता पाहून बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सही स्टोक्सला घेण्यासाठी लिलाव प्रक्रियेत उतरली. या दोन्ही संघांमध्ये चांगलीच चुरस लागली होती. या दोघांमध्ये स्पर्धा सुरू असताना यामध्ये हैदराबाद सनरायजर्सनेही उडी घेतली. त्यांनीही स्टोक्सवर बोली लावली. त्यामुळे स्टोक्सला आपल्याकडे घेण्यासाठी इच्छुकांच्या संख्येत वाढ झाली. बोली लावणारे जास्त झाल्यामुळे स्टोक्सची किंमतही आपोआपच वाढू लागली. स्टोक्सची किंमत वाढल्यामुळे मुंबई इंडियन्सने यातून आपले अंग काढून घेतले. पण तितक्यात रायझिंग पुणे सुपरजायंट्सने यात स्वारस्य दाखवले. अखेर स्टोक्स कोणत्या संघाकडे जाणार याची उत्सुकता सर्वच संघाना लागली होती. परंतु या लिलाव प्रक्रियेत शेवटी येऊनही पुणे सुपरजांयट्सने बाजी मारली. त्यांनी स्टोक्सला चक्क १४.५० कोटींना विकत घेतले.
लिलाव प्रक्रियेत संघामध्ये लागलेल्या चुरशीमुळे मात्र स्टोक्सचे हात सोन्याहून पिवळे झाले आणि त्याला साडेचौदा कोटी रूपये मिळाले.