LSG Head Coach Justin Langer On KL Rahul- Goenka Controversy: माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू व प्रशिक्षक जस्टीन लँगर हे यंदाच्या आयपीएलमध्ये लखनौ सुपर जाएंट्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहात आहेत. लखनौची यंदाच्या आयपीएलमधील सुरुवात दणक्यात झाली असली तरी आता प्रत्येक सरत्या सामन्यानंतर आयपीएलचे प्लेऑफ गाठण्याच्या संघाच्या आशा मावळताना दिसतायत. काही दिवसांपूर्वी अशाच एका सामन्यात संघाचा खेळ पाहून स्वतः लखनौ सुपर जाएंट्सचे मालक संजीव गोयंका सुद्धा कर्णधार केएल राहुलवर भडकले होते. मैदानातच गोयंका यांनी केएल राहुलला सुनावल्याचे दाखवणारे व्हिडीओ, वृत्त सगळीकडे व्हायरल झाले होते. यावर स्वतः एलएसजीचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी स्पष्टीकरण देत ही ‘कॉफीच्या कपातील वादळ’ (शुल्लक वाद) आहेत असं म्हणत संघात मतभेद नसल्याचे सांगितले आहे. अलीकडेच टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याविषयी माहिती दिली तसेच पहिल्यांदा आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून काम करताना आलेल्या अनुभवाविषयी सुद्धा भाष्य केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयपीएलमुळे खेळाडूंचा इगो वाढतो का?

आयपीएल हे क्रिकेटइतकेच व्यवसायाचे माध्यम आहे असं म्हणताना जस्टीन यांना मुलाखतीत खेळाडूंना पटकन मिळणाऱ्या प्रसिद्धीविषयी प्रश्न करण्यात आला होता. “आयपीएलमध्ये पैसे वाहते असतात आणि त्यामुळे खेळाडू चटकन सुपरस्टार बनतात पण यामुळे त्यांच्यातील इगो मोठा होतो असं वाटतं का?” या प्रश्नावर उत्तर देताना जस्टीन यांनी रोहित शर्मा व धोनीसहित भारतीय खेळाडूंबाबतचे निरीक्षण नोंदवले आहे.

जस्टीन सांगतात की, मी ज्या ऑस्ट्रेलियन संघात खेळलो त्यामध्ये आमच्याकडे मॅथ्यू हेडन, शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा, रिकी पाँटिंग होते. ते त्यांच्या कामगिरीमुळे सुपरस्टार खेळाडू होते, त्यांनी किती पैसे कमावले हा मुद्दा तितका महत्त्वाचा नव्हताच. आम्ही खेळाडूंना किती पैसे मिळतात यावर नव्हे तर कामगिरी पाहून न्याय करतो. खेळात खूप पैसे आहेत. पण तरीही तुम्हाला उत्तम खेळाडू व्हायचे आहे. एमएस धोनी हा त्याने खूप पैसे कमावले म्हणून एमएस धोनी झालेला नाही.

धोनी, रोहित शर्मा किंवा विराट कोहली होण्यासाठी काय कराल?

“धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल हे श्रीमंत आहेत, परंतु त्यांच्या कामगिरीमुळे ते सुपरस्टार आहेत. धोनीने विश्वचषक जिंकला आणि तो खेळातील सर्वोत्तम फिनिशर होता. ती कामगिरी लोक कधीच विसरणार नाहीत. भारतात, १.४ अब्ज क्रिकेटप्रेमी लोक आहेत. तुम्ही लोकांमधून सुद्धा पाच संघ तयार करू शकता जे बहुतांश देशाच्या संघांना पराभूत करू शकतील. भारतात खूप टॅलेंट आहे. पण यामुळेच अनेक युवा खेळाडू दडपणात असतात, मी पाहिलंय इथे प्रत्येकाला धोनी, रोहित शर्मा किंवा विराट कोहली व्हायचे आहे. पण त्यांच्या जागी पोहोचण्यासाठी खूप मोठा प्रवास करावा लागणार आहे. शिवाय तितके यश मिळवल्यावर सुद्धा ते राखून ठेवण्यासाठी फक्त आणि फक्त तुमची कामगिरीच कामी येऊ शकते.”

इथे Heart Break जास्त!

जेव्हा मी आयपीएलच्या मिनी-लिलावात गेलो होतो तेव्हा पाहिलं की अनेक खेळाडूंना विकत घेतलं गेलं नाही, तेव्हा त्यांनाही दुःख झालं असणारच. हा असाच खेळ आहे. इथे यशापेक्षा जास्त वेळा तुमचं मन दुःखी होणार आहे. त्यातून वाट काढून जे यशस्वी होतात त्यांच्यासाठी खेळात खूप पैसे आहेत. कदाचित त्यानंतरही काही जण सोशल मीडियावर, जाहिरातींमधून खूप पैसे कमावू शकतात पण जर तुम्ही चांगलं खेळला नाहीत तर तुमचं करिअर उद्ध्वस्त होणार हे निश्चित असतं.

हे ही वाचा << केएल राहुलवर LSG चे मालक संजीव गोयंका भडकले की..? अखेर प्रशिक्षकांनी सांगितलं कारण, म्हणाले, “पाठिंबाच नाही..”

तर पैसे तुमच्याकडे येणारच!

जेव्हा मी माझी तिसरी कसोटी खेळलो तेव्हा महान ॲलन बॉर्डरने एक सल्ला दिला होता जो मी आजही खेळाडूंना देतो. त्याने महागडे, ब्रँडेड शूज घातले होते आणि मी त्याला विचारले की तो मला शू स्पॉन्सरशिप मिळविण्यात मदत करू शकेल का? तो मला म्हणाला, तू सर्वात जास्त धावा केल्यास , तू सर्वोत्तम फलंदाज झालास तर तुला शूज, सनग्लासेस, प्रसिद्धी, पैसे हे सगळंच इतकं जास्त मिळेल की त्याची तू कल्पनाही करू शकणार नाहीस, त्यामुळे फक्त तेवढ्यावरच लक्ष केंद्रित कर.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dhoni is not dhoni due to money says lsg coach after kl rahul goenka controversy speaks about ego in ipl refer rohit sharma virat kohli svs
Show comments