Hardik Pandya pushing Lasith Malinga Video Viral : मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्या सध्या आयपीएल २०२४ मध्ये चर्चेचा केंद्रबिंदू आहे. हार्दिक पंड्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामुळे तो पुन्हा एकदा वादात सापडला आहे. हार्दिक पंड्याच्या या व्हिडीओने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक पंड्या संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगाला धक्का देत असल्याचे चाहत्यांचे मत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चाहते हार्दिक पंड्याला सतत ट्रोल करत आहेत.

वास्तविक, बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या सामन्यात ही घटना घडली. सामना संपल्यानंतर दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी हस्तांदोलन करत असताना मुंबई इंडियन्सचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा हस्तांदोलन आणि मिठी मारण्यासाठी हार्दिक पंड्याकडे गेला, पण त्यावेळी हार्दिक लसिथ मलिंगाला बाजूला ढकलताना दिसला. हार्दिक पंड्याने लसिथ मलिंगाशी हस्तांदोलन केले नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करताना दिसला. यावेळी लसिथ मलिंगाचा चेहराही उदास दिसत होता.

त्यानंतर हार्दिक पंड्या इतर खेळाडूंशी हस्तांदोलन करुन पुढे निघून गेला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा हार्दिक पंड्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. आयपीएल २०२४ च्या मोसमाची सुरुवात मुंबई इंडियन्ससाठी खूपच भयानक झाली आहे. मुंबई इंडियन्सला त्यांच्या पहिल्या दोन सामन्यांत सलग दोन पराभवांचा सामना करावा लागला आहे.

हेही वाचा – IPL 2024 : राजस्थानविरुद्धच्या सामन्यात रिकी पाँटिंगने पंचाशी घातला वाद, काय होतं कारण? जाणून घ्या

मुंबई इंडियन्सचा पहिल्या सामन्यात गुजरात टायटन्सकडून पराभव झाला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा सनरायझर्स हैदराबादकडून पराभव झाला. मुंबई इंडियन्स संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्सने आयपीएल २०२४ मध्ये हार्दिक पड्याला आपला कर्णधार बनवले आणि आतापर्यंत त्याच्या नेतृत्वाखाली संघाची कामगिरी खूपच खराब झाली आहे.