लखनऊ : कोलकाता नाइट रायडर्सचा प्रयत्न रविवारी होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेट सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध आपली विजयी लय कायम राखण्याचा असेल.

मुंबई इंडियन्सविरुद्ध २४ धावांनी विजय मिळवल्यानंतर कोलकाता संघाचे १४ गुण झाले आहेत आणि संघ ‘फ्ले-ऑफ’मध्ये स्थान निश्चित करण्याच्या जवळ पोहोचला आहे. दुसरीकडे, केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ संघाने १० सामन्यांत सहा विजय नोंदवत १२ गुणांची कमाई केली आहे. ते कोलकातानंतर गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. चौथ्या स्थानी असणाऱ्या सनरायजर्स हैदराबादसह (१२ गुण) चेन्नई सुपर किंग्ज (१० गुण) आणि दिल्ली कॅपिटल्स (१० गुण) हे संघ शीर्ष चार संघात स्थान मिळवण्यासाठी शर्यतीत आहेत.

स्टोइनिस, पूरनवर भिस्त

गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध कमी धावांचा पाठलाग करताना लखनऊची दमछाक झाली होती. कर्णधार राहुल आणि अष्टपैलू मार्कस स्टोइनिस यांनी लखनऊसाठी चांगली कामगिरी केली आहे. या सामन्यात क्विंटन डीकॉकला संघात स्थान मिळते याकडे सर्वांचे लक्ष असेल. निकोलस पूरनने या हंगामात एकही अर्धशतक झळकावले नसेल, तरीही संघासाठी अखेरच्या षटकात त्याने जलदगतीने धावा केल्या आहेत. आयुष बदोनीलाही एक सामना सोडल्यास चमक दाखवता आलेली नाही.

हेही वाचा >>> IPL 2024: विराट कोहलीचा भन्नाट रॉकेट थ्रो अन् शाहरूख खान असा झाला रनआऊट, ग्रीनच्या प्रतिक्रियेने वेधलं लक्ष, VIDEO व्हायरल

नरेन, िंकूकडे लक्ष

कोलकाताचा संघ या हंगामात चांगल्या लयीत आहे. त्यांना केवळ तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात संघाची अवस्था ५ बाद ५७ अशी बिकट झाली होती. मात्र, वेंकटेश अय्यर (७०) व मनीष पांडे (४२) यांनी निर्णायक भागीदारी रचत संघाला सुस्थितीत पोहोचवले. या सामन्यातही त्यांच्याकडून अपेक्षा असेल. सध्या संघाकडून सुनील नरेन सर्वच विभागात चमकदार कामगिरी करत आहे. या सामन्यातही त्याच्याकडे लक्ष राहील. यासह संघात आंद्रे रसेल, रिंकू सिंह सारखे खेळाडू आहेत ते मोठे फटके मारण्यास सक्षम आहे. संघाच्या गोलंदाजीची मदार मिचेल स्टार्क, वरुण चक्रवर्ती व नरेन यांच्यावर असेल.

* वेळ : सायं. ७.३० वा. * थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अ‍ॅप.