Kolkata Knight Riders beat Royal Challengers Bangalore by 7 wickets : आयपीएलच्या १७व्या हंगामातील १०वा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम पार पडला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नाइट रायडर्स आमनेसामने आले होते. या सामन्यात गौतभ गंभीरच्या केकेआरने विराट कोहलीच्या आरसीबीचा ७ विकेट्सनी पराभव केला. त्याचबरोबर यंदाच्या हंगामातील सलग दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात केकेआरसाठी व्यंकटेश अय्यने (५०) तर आरसीबीसाठी विराट कोहलीने (८३*) सर्वाधिक धावांचे योगदान दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सामन्यात कोलकाताना नाइट रायडर्स संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला फलंदाजासाठी आमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या आरसीबी संघाने विराट कोहलीच्या नाबाद ८३ धावांच्या जोरावर ६ बाद १८२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरने १८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना व्यंकटेश अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर १६.५ षटकांत ३ गडी गमावून विजयावर शिक्कामोर्तब केला. कर्णधार श्रेयस अय्यरने केकेआरसाठी विजयी षटकार मारला. तसेच बेंगळुरूमधील आपल्या विजयी विक्रम कायम राखला.

१८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फिल सॉल्ट आणि सुनील नरेन यांनी कोलकाताला दमदार सुरुवात करून दिली. आरसीबीच्या गोलंदाजांटी धुलाई करताना दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८६ धावांची भागीदारी केली. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर मयंक डागरने ही भागीदारी मोडली. नरेन २२ चेंडूत ४७ धावा करून बाद झाला. त्याने २१३.६३ च्या स्ट्राईक रेटने दोन चौकार आणि पाच षटकार मारले. त्याचवेळी फिलिप सॉल्टने दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३० धावा केल्या.

हेही वाचा – KKR vs RCB : किंग कोहलीने मोडला धोनी आणि गिलचा ‘विराट’ विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा फलंदाज

या सामन्यात व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यर यांच्यात चांगली भागीदारी झाली. संघाला तिसरा धक्का व्यंकटेशच्या रूपाने बसला. २९ चेंडूत अर्धशतक झळकावून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. १६व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर यश दयालने या फलंदाजाला आपला बळी बनवले. त्याने कर्णधारासह ७५ धावांची भागीदारी केली.

रिंकू सिंग पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला आणि पाच धावा करून नाबाद राहिला. तर श्रेयस अय्यरने षटकार ठोकत संघाला विजय मिळवून दिला. त्याने २४ चेंडूंचा सामना केला आणि १६२.५० च्या स्ट्राइक रेटने ३९ धावा केल्या. या काळात तो नाबाद राहिला. आरसीबीकडून विजयकुमार, मयंक डागर आणि यश दयाल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – RCB vs KKR : विराट-गौतमने जिंकली सर्वांची मनं, गतवर्षातील वाद विसरुन एकमेकांची घेतली गळाभेट, VIDEO व्हायरल

त्तत्पूर्वी नाणेपेक गमावून फलंदाजीला आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने घरच्या मैदानाचा फायदा घेत संघाने २० षटकांत ६ गडी गमावून १८२ धावा केल्या. यादरम्यान विराट कोहलीने नाबाद ८३ धावांची खेळी करत महत्वाचे योगदान दिले. संघाचा कर्णधार फाफ डुप्लेसिस आठ धावा करून बाद झाला. त्याचवेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या कॅमेरून ग्रीनने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. ग्रीन २१ चेंडूत ३३ धावा करून बाद झाला. नवव्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर रसेलने ग्रीनला आपला बळी बनवले.

आरसीबी संघाला तिसरा धक्का मॅक्सवेलच्या रूपाने बसला, ज्याला नरेनने आपला बळी बनवले. या सामन्यात रजत पाटीदार आणि अनुज रावत प्रत्येकी तीन धावा करून बाद झाले. त्याचवेळी दिनेश कार्तिकने कोहलीसह सहाव्या विकेटसाठी ३१ धावांची भागीदारी केली. कोलकाताकडून आंद्रे रसेल आणि हर्षित राणा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले तर सुनील नरेनला एक यश मिळाले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2024 rcb vs kkr kolkata knight riders beat royal challengers bangalore by 7 wickets vbm
Show comments