आयपीएलच्या तेराव्या हंगामाची सुरुवात गतविजेत्या मुंबई इंडियन्सवर मात करुन करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जला दुसऱ्याच सामन्यात धक्का बसला आहे. राजस्थान रॉयल्सने चेन्नईवर १६ धावांनी मात करत पहिला विजय नोंदवला. राजस्थानने विजयासाठी दिलेल्या २१७ धावांचं पाठलाग करताना चेन्नईचा संघ २०० धावांपर्यंतच मजल मारु शकला. २१७ धावांचं आव्हान असताना धोनीने सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येणं पसंत केलं. ज्यामुळे सोशल मीडियावर चाहते नाराज आहे. संघाला गरज असताना धोनी उशीरा फलंदाजीला येऊन काय साध्य करतोय असा सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनेही धोनीच्या या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करुन टीका केली आहे.

अवश्य वाचा – IPL 2020 : …म्हणून धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला

“खरं सांगायला गेलं तर मला थोडं आश्चर्य वाटलं. धोनी सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येतो?? ऋतुराज गायकवाड, सॅम करन यासारख्या फलंदाजांना आधी संधी देऊन काय साध्य करायचं होतं. तू कर्णधार आहेस तर त्याप्रमाणे पुढे येऊन नेतृत्व करणं अपेक्षित आहे. राजस्थानविरुद्ध सामन्यात धोनीने जे केलं त्याला नेतृत्व करणं म्हणत नाही. २१७ चं आव्हान असताना सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन काय उपयोग…सामना तर केव्हाच संपला होता. डु-प्लेसिसने एकाकी झुंज दिली.” ESPNCricinfo संकेतस्थळाशी बोलताना गंभीरने आपलं परखड मत मांडलं.

अवश्य वाचा – Video : धोनीने मारलेला बॉल थेट मैदानाबाहेर, रस्त्यावरील व्यक्तीला मिळाला बॉल

अखेरच्या षटकात धोनीने ३ षटकार खेचले…त्याबद्दल चर्चा होईल. पण खरं सांगायला गेलं तर त्याला काहीच अर्थ नव्हता. हे फक्त त्याच्या वैय्यक्तित खात्यातले रन्स होते. धोनीच्या जागेवर दुसरा कोणताही कर्णधार सातव्या क्रमांकावर आला असता तर त्याच्यावर टीकेचा भडीमार झाला असता. इथे धोनी सातव्या क्रमांकावर आला असल्यामुळे लोकं फारशी चर्चा करत नाहीयेत, असं म्हणत गंभीरने धोनीच्या नेतृत्वक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं.

अवश्य वाचा – IPL 2020 : पदार्पणाच्या सामन्याआधी यशस्वी जैस्वालने घेतले धोनीचे आशिर्वाद, पाहा व्हिडीओ