आयपीएलच्या तेराव्या हंगामात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने अखेरीस अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणारा रोहित शर्मा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे. हा टप्पा पूर्ण करण्यासाठी रोहितला अवघ्या २ धावांची गरज होती. पंजाबचा कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. क्विंटन डी-कॉकसोबत सलामीला आलेल्या रोहितने २ धावांची औपचारिकता पूर्ण करत हा मैलाचा दगड पार केला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुविरुद्ध सामन्यात रोहितला हा विक्रम पूर्ण करण्याची संधी होती. परंतू ८ धावांवर बाद झाल्यामुळे त्याचा हा विक्रम लांबवणीवर पडला.

विराट कोहली आणि सुरेश रैना या दोन भारतीय फलंदाजांना आतापर्यंत आयपीएलमध्ये ५ हजार धावांचा टप्पा पूर्ण करणं जमलं आहे. या दोन्ही फलंदाजांनंतर अशी कामगिरी करणारा रोहित तिसरा फलंदाज ठरला आहे. आयपीएलमध्ये रोहितच्या नावावर ३७ अर्धशतकं तर १ शतकं जमा आहे. दरम्यान मुंबईने पंजाबविरुद्ध सामन्यात संघात कोणतेही बदल केले नाहीयेत. पंजाबने मात्र मुरगन आश्विनच्या जागी गौतमला संघात स्थान दिलंय.

अवश्य वाचा – Video : त्याचा विचार नको करु ! श्रीरामपूरचा झहीर आणि बीडचा दिग्वीजय जेव्हा युएईत मराठीत बोलतात