आयपीएलच्या तेराव्या हंगामातली रंगत अजुनही शिल्लक आहे. युएईत सुरु असलेली ही स्पर्धा आता उत्तरार्धाकडे झुकत चालली आहे. सर्व संघ प्ले-ऑफमध्ये आपलं स्थान मिळवण्यासाठछी धडपड करत आहेत. दुबईच्या मैदानावर खेळवण्यात येत असलेल्या हैदराबाद विरुद्ध राजस्थान सामन्यात, हैदराबादच्या गोलंदाजांनी पहिल्या डावात टिच्चून मारा करत राजस्थानचा १५४ धावांवर रोखलं. १५५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबादची सुरुवातही खराब झाली.

जोफ्रा आर्चरने आपल्या भेदक माऱ्याच्या जोरावर हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि त्याचा साथीदार जॉनी बेअरस्टोला माघारी धाडलं. पहिल्याच षटकात ४ धावा काढून वॉर्नर माघारी परतला. याआधी २०१६ साली डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये पहिल्याच षटकात बाद झाला होता. अशोक दिंडाने त्याला माघारी धाडलं होतं. यानंतर ४ वर्षांनी वॉर्नरवर ही वेळ आली आहे.

यानंतरतच्या षटकात आर्चरने बेअरस्टोचा त्रिफळा उडवत संघाला आणखी एक यश मिळवून दिलं. बेअरस्टो १० धावा काढून बाद झाला. त्याआधी संकाटात सापडलेल्या राजस्थान रॉयल्सला जोफ्रा आर्चरने अखेरच्या षटकांत फटकेबाजी करुन १५४ धावांचा पल्ला गाठून दिला.