लोकेश राहुलच्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघासाठी आयपीएलचा यंदाचा हंगाम फारसा चांगला गेलेला नाही. सलग पराभवांचा सामना करावा लागल्यामुळे पंजाबचा संघ यंदा गुणतालिकेत तळाशी आहे. ख्रिस गेलसारखा धडाकेबाज फलंदाज संघात असतानाही त्याला आतापर्यंत संघात स्थान न मिळाल्यामुळे पंजाबचा प्रशिक्षक अनिल कुंबळेला टीकेचा धनी व्हावं लागलं होतं. गुणतालिकेत सर्वात अखेरच्या स्थानावर असलेल्या पंजाबला यंदा प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवणं खूप कठीण मानलं जात आहे. संघ संकटात सापडलेला असताना पंजाबच्या संघ व्यवस्थापनाला आता ख्रिस गेलची आठवण झाली आहे. गुरुवारी RCB विरुद्ध सामन्यात गेल पंजाबकडून खेळणार असल्याचे संकेत मिळतायत.

ख्रिस गेलने आपल्या सर्व चाहत्यांसाठी एका व्हिडीओच्या माध्यमातून संदेश दिला आहे. तुम्ही सर्वजण माझी वाट पाहत होतात, हे मला माहिती आहे. पण ती वेळ आता आली आहे…असं म्हणत गेलने आपल्या पुनरागमनाचे संकेत दिले आहेत.

आतापर्यंत झालेल्या सात सामन्यांमध्ये पंजाबने १ विजय आणि ६ पराभव स्विकारले आहेत. आगामी सामन्यांमध्ये दोन पराभव झाल्यास पंजाबचं स्पर्धेतलं आव्हान संपूष्टात येईल. मात्र आयपीएलमध्ये याआधीच्या हंगामांमध्ये मुंबई-चेन्नई यासारख्या संघांनी अशाच खडतर परिस्थितीवर मात करुन प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. त्यामुळे पंजाबचा संघ ही किमया साधू शकतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.