IPL 2020 CSK vs SRH: हैदराबादविरूद्ध झालेल्या रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने २० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत चेन्नईने १६७ धावा केल्या होत्या. त्यात शेन वॉटसन आणि अंबाती रायडू या अनुभवी जोडीच्या ८१ धावांच्या भागीदारीचे मोठे योगदान होते. १६८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादकडून अनुभवी केन विल्यमसनने एकाकी झुंज देत अर्धशतक (५७) ठोकले, पण त्याची खेळी व्यर्थ ठरली. हैदराबादच्या संघाला २० षटकांत ८ बाद १४७ धावांपर्यंतच मजल मारता आली. धोनीच्या चेन्नई संघाने स्पर्धेतील तिसरा विजय साकारला. या सामन्यानंतर महेंद्रसिंग धोनी टीकेचे लक्ष्य ठरला.

नक्की काय घडला प्रकार?

सामन्याच्या १९व्या षटकात शार्दूल ठाकूर गोलंदाजीसाठी आला. हैदराबादला विजयासाठी २७ धावांची गरज होती. हैदराबादकडून राशिद खान आणि शाहबाज नदीम फलंदाजी करत होते. आधीच्या षटकाच्या शेवटच्या दोन चेंडूंवर चौकार गेल्यामुळे धोनी काहीसा त्रस्त होता. षटक संपल्यानंतर त्याने कर्ण शर्माला जवळ बोलावून त्याची चूक समजेल अशा भाषेत सांगितल्याचे धोनीच्या हावभावावरून दिसून आले. १९व्या षटकातील पहिला चेंडू वाइड रेषेच्या बाहेर असल्याने राशिद खानने फटका मारण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे तो चेंडू वाइड देण्यात आला. त्यानंतर शार्दुल ठाकूरने पुन्हा तशाच पद्धतीचा चेंडू टाकला. राशिदने जागेवरूनच चेंडू फटकावण्याचा प्रयत्न केला पण चेंडू बॅटला स्पर्श न करता धोनीकडे गेला. हा चेंडूदेखील नियमानुसार वाइड देण्यासाठी पंच पॉल राफेल हे खूण करणार तोच शार्दुल ठाकूर आणि धोनी यांनी आरडाओरडा केला. त्या राड्यामुळे वाइड देण्यासाठी अर्धवट उघडलेले हात पंचांनी बंद केले आणि वाइड देण्याचा निर्णय रद्द केला.

पाहा व्हिडीओ-

घडलेला प्रकार चाहत्यांच्या आणि नेटिझन्सच्या अजिबातच पचनी पडला नाही. ‘कॅप्टन कूल असं बिरूद मिरवणारा धोनी रागाच्या भरात पंचांवर आवाज कसा काय चढवू शकतो?’, ‘धोनीसारखे दिग्गज खेळाडू कायमच पंचांवर दडपण आणतात’, ‘पंच वाइड देत असताना धोनी त्यांच्यावर ओरडला म्हणून पंचानी निर्णय रद्द केला’, ‘वाइड न देण्यासाठी पंचांवर धोनीने दबाव आणला’, ‘धोनी स्वत:लाच पंच समजतोय’, अशा प्रकारे धोनीबाबत नेटकऱ्यांमध्ये संताप आणि चिड दिसून आली. पाहूया त्यापैकी काही निवडक ट्विट-

दरम्यान, CSKने या विजयासह स्पर्धेत एकूण ६ गुण मिळवले. त्यामुळे गुणतालिकेत हैदराबादचा संघ ६ गुणांसह पाचव्या तर चेन्नईचा संघ तेवढ्याच गुणांसह ६व्या स्थानी आहे.