Kolkata Knight Riders beat Sunrisers Hyderabad by 8 wickets : केकेआरने स्टार्कच्या शानदार गोलंदाजीनंतर व्यंकटेश -श्रेयसच्या अर्धशतकांच्या जोरावर क्वालिफायर-१ सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा ८ गडी राखून पराभव केला. या विजयासह कोलकाता नाईट रायडर्सने अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने राहुल त्रिपाठीच्या ५५ धावांच्या जोरावर १९.३ षटकांत १५९ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात केकेआरने श्रेयसच्या नाबाद ५८ धावा आणि व्यंकटेशच्या नाबाद ५१ धावांच्या खेळीच्या जोरावर १३.४ षटकांत दोन गडी गमावून १६४ धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हैदराबादला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी आणखी एक संधी –

कोलकाता नाईट रायडर्सने ने अशा प्रकारे क्वालिफायर-१ मध्ये अपराजित राहण्याचा विक्रम कायम ठेवला आहे. त्याचबरोबर आयपीएल २०२४ च्या अंतिम फेरीत पोहोचणारा पहिला संघ ठरला. पराभवानंतरही हैदराबादचा संघ स्पर्धेबाहेर झाला नसून त्यांना विजेतेपदाच्या लढतीत प्रवेश करण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. हैदराबादचा आता शुक्रवारी क्वालिफायर-२ मध्ये बुधवारी आरसीबी आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील एलिमिनेटरच्या विजेत्याशी सामना होईल. क्वालिफायर-२ चा विजेता संघ रविवारी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणाऱ्या विजेतेपदाच्या लढतीत केकेआरशी भिडणार आहे.

व्यंकटेश आणि श्रेयसची नाबाद ९७ धावांची भागीदारी –

हैदराबादने दिलेल्या १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना सुनील नरेन आणि रहमानउल्ला गुरबाज यांनी केकेआरला दमदार सुरुवात करून दिली. दरम्यान, चौथ्या षटकात गुरबाज १४ चेंडूत २३ धावा काढून बाद झाला. या दमदार सुरुवातीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने पॉवरप्ले षटकांत १ गडी गमावून ६३ धावा केल्या होत्या. पॉवरप्ले संपल्यानंतरही केकेआरचा रनरेट कमी झाला नाही. १० षटकांच्या अखेरीस कोलकाताने २ गडी गमावून १०७ धावा केल्या होत्या आणि संघाला विजयासाठी ६० चेंडूत ५३ धावा करायच्या होत्या. दरम्यान, व्यंकटेश अय्यरने २८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले, तर कर्णधार श्रेयस अय्यरने २३ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस यांच्यातील ९७ धावांच्या नाबाद भागीदारीमुळे कोलकाता नाईट रायडर्सचा ८ गडी राखून विजय निश्चित झाला. सनरायझर्स हैदराबाद संघाकडून गोलंदाजी करताना पॅट कमिन्स आणि टी नटराजनने प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा – KKR vs SRH Qualifier 1 : राहुल त्रिपाठी धावबादनंतर भावूक, पायऱ्यांवर बसून रडतानाचा VIDEO व्हायरल

राहुल त्रिपाठीची अर्धशतकी खेळी ठरली व्यर्थ –

तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ट्रॅव्हिस हेड पहिल्याच षटकात शून्य धावांवर बाद झाल्याने सनरायझर्स हैदराबादची सुरुवात खूपच खराब झाली. अभिषेक शर्माही दुसऱ्या षटकात ३ धावा काढून बाद झाला. हेड आणि अभिषेकची खतरनाक जोडी बाद झाली. एसआरएचची अवस्था इतकी वाईट झाली होती की पॉवरप्ले ओव्हर्समध्ये टीमने ४५ धावांवर ४ विकेट गमावल्या. दरम्यान, राहुल त्रिपाठी आणि हेनरिक क्लासेन यांच्यात ६२ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली आणि दोघांनीही धावगती सुधारली. दरम्यान, क्लासेन ११व्या षटकात ३२ धावा काढून बाद झाला.

हेही वाचा – VIDEO : स्टार्कच्या भेदक चेंडूवर हेडच्या दांड्या गुल, मागे वळून पाहातच राहिला; नेमकं काय घडलं?

मिचेल स्टार्कच्या वेगवान माऱ्यापुढे हैदराबादचे सपशेल लोटांगण –

त्रिपाठीसोबत अब्दुल समदही चांगलाच संपर्कात असल्याचे दिसत होते, मात्र १४व्या षटकात त्रिपाठी ५५ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. संघाची अवस्था इतकी बिकट होती की १५ षटकांत हैदराबादची धावसंख्या ८ विकेट्सवर १२५ धावा होती. यानंतर कर्णधार पॅट कमिन्स कसा तरी डाव पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पॅट कमिन्स आणि विजयकांत यांच्यात शेवटच्या विकेटसाठी ३३ धावांची भागीदारी झाली होती, मात्र २० व्या षटकात कमिन्स ३० धावांवर बाद झाला. यासह सनरायझर्स हैदराबादचा डाव १५९ धावांवर गारद झाला. त्यांच्या सात फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. केकेआरसाठी मिचेल स्टार्कने सर्वाधिक विकेट घेतल्या, ज्याने पॉवरप्लेमध्येच ३ विकेट्स घेतल्या. स्टार्कनंतर वरुण चक्रवर्तीने फिरकीचे जाळे विणत २ महत्त्वाच्या २ विकेट्स घेतल्या.

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kkr vs srh match kolkata knight riders beat sunrisers hyderabad by 8 wickets in qualifier 1 to enter ipl 2024 final vbm