Rashid Khan is 4 wickets away from creating history : गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल २०२४ मधील पाचवा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात अफगाणिस्तानचा स्टार फिरकी गोलंदाज राशिद खान अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर तो गुजरात टायटन्सकडून खेळताना दिसणार आहे. या मोसमातील पहिल्याच सामन्यात राशिद खानचे लक्ष एका खास विक्रमावर असणार आहे. तो या खास टप्प्यापासून फक्त काही अंतर दूर आहे, ज्यानंतर तो हा टप्पा गाठणार गुजरात टायन्सचा पहिला गोलंदाज ठरणार आहे.

राशिद गुजरातचा हा पराक्रम करणारा पहिला गोलंदाज ठरणार –

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या हाय-व्होल्टेज सामन्यात, राशिदला इतिहास रचण्याची आणि लीगमध्ये ५० विकेट्स घेणारा गुजरातचा पहिला गोलंदाज बनण्याची संधी आहे. गुजरातकडून खेळताना त्याने आतापर्यंत ३३ आयपीएल सामन्यांमध्ये ४६ फलंदाजांना बाद केले आहे. फ्रँचायझीसाठी तो आयपीएलचा दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. जर राशिद या सामन्यात ४ विकेट घेण्यात यशस्वी ठरला, तर तो संघासाठी आयपीएलमध्ये ५० विकेट्सचा आकडा पार करणारा गुजरातचा पहिला गोलंदाज ठरेल.

मोहम्मद शमीच्या नावावर सर्वाधिक विकेट्स –

भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी सध्या गुजरातसाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज आहे. त्याने ३३ सामन्यांमध्ये ४८ फलंदाजांना बाद केले आहे. दुखापतीमुळे तो चालू आयपीएल हंगामातून बाहेर आहे. गेल्या आयपीएल हंगामात मोहम्मद शमीने सर्वाधिक विकेट घेत पर्पल कॅप जिंकली होती. मोहम्मद शमी २०२३ मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज होता.

हेही वाचा – Gujarat Titans : “त्याला जबाबदारी लवकर मिळाली पण…”, शुबमन गिलच्या कर्णधारपदावर शमीची प्रतिक्रिया

पहिल्याच सामन्यात गुजरातसमोर मुंबईचे आव्हान –

गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात हार्दिक पंड्या त्याच्या माजी फ्रँचायझीविरुद्ध खेळणार आहे. ३० वर्षीय भारतीय अष्टपैलू हार्दिकने २०२२ मध्ये गुजरात संघाचे नेतृत्व करून आयपीएलचे जेतेपद पटकावले होते. त्याच वेळी, २०२३ मध्ये संघाला अंतिम फेरीत नेण्यात तो यशस्वी ठरला. आता तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे. आयपीएल २०२४ च्या लिलावापूर्वी तो मुंबईत दाखल झाला. हार्दिक मुंबईत आल्यानंतर २४ वर्षीय युवा भारतीय फलंदाज शुबमन गिलला गुजरात टायटन्सचा कर्णधार बनवण्यात आले आहे. अशा स्थितीत मुंबई आणि गुजरात यांच्यातील सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.