Rohit Sharma To Leave MI Next Year Says Wasim Akram: पाकिस्तानी माजी वेगवान गोलंदाज वसीम अक्रमने मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा याच्या आयपीएलमधील पुढील हंगामाविषयी एक इच्छा वजा भाकीत वर्तवलं आहे. आयपीएलच्या चषकावर पाच वेळा नाव कोरलेल्या मुंबईच्या संघाचा २०२४ मधील प्रवास आता संपुष्टात आला आहे. या हंगामात हार्दिक पंड्याला कर्णधार म्हणून नियुक्त करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला होता व त्याचा प्रभाव खेळावर व खेळाबाहेर सुद्धा पाहायला मिळाला. रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवल्यानंतर चाहत्यांनी हार्दिक पंड्याला मैदानात येतानाही भीती वाटेल इतकं ट्रोल केलं होतं, गंमत अशी की मागच्या काही सामन्यांमध्ये रोहित शर्मा स्वतःच आपली जादू न दाखवू शकल्याने ज्या चाहत्यांनी रोहितची हार्दिकला सुनावलं होतं तेच पुन्हा रोहितला खरं- खोटं ऐकवायला लागले होते. काहींनी तर टी २० विश्वचषकात रोहितला कर्णधार करण्यावरूनही टीका केली होती. या सगळ्या टीकासत्रात आता वसीम अक्रमने रोहितच्या भविष्याबद्दल केलेलं वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.

वसीम अक्रम काय म्हणाला?

रोहितला काढून टाकण्याच्या एमआयच्या निर्णयावर यापूर्वी नाराजी व्यक्त करणाऱ्या अक्रमने स्पोर्ट्सकीडाच्या मुलाखतीत सांगितले की, “गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली दोन वेळा चॅम्पियन ठरलेल्या कोलकाता नाईट रायडर्सच्या संघात रोहित शर्माला बघाला आवडेल. मला असं वाटतं की पुढच्या हंगामात तो मुंबईच्या संघात नसेल. असं झालं तर मला त्याला केकेआरसह खेळताना बघायला आवडेल. गौतमच्या मार्गदर्शनाखाली, श्रेयस अय्यर कर्णधार असलेल्या या संघात रोहित खूप मजबूत फलंदाजी करू शकतो. ईडन गार्डन्ससारख्या विकेट्सवर त्याची फलंदाजी चांगली होऊ शकते. त्याला केकेआरमध्ये बघायला मिळणे आनंददायी असेल. “

रोहित शर्मासाठी IPL २०२४ का ठरले वाईट?

यंदा रोहितने स्पर्धेची सुरुवात उत्तम केली होती परंतु शेवटच्या सहा सामन्यांमध्ये, प्रत्येक खेळासह त्याचा फॉर्म खराब होत गेला. अनेकदा तर एक अंकी धावसंख्येचा पुढेही हा भारताचा धडाकेबाज सलामीवीर जाऊ शकला नाही. परिणामी, त्याने गेल्या पाच डावांमध्ये केवळ ३३ धावा केल्या होत्या. सनरायजर्स हैदराबादसमोर मुंबईने विजय मिळवला असला तरी रोहितला केवळ ४ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले होते. केवळ आयपीएलसाठीच नव्हे तर अवघ्या महिन्याभरवर येऊन ठेपलेल्या टी २० विश्वचषकासाठी सुद्धा रोहितचा हा फॉर्म चिंताजनक ठरू शकतो. यूएसए आणि वेस्ट इंडिज येथे होणाऱ्या आगामी T20 विश्वचषक स्पर्धेत मेन इन ब्लूचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.

IPL २०२४ प्ले ऑफचं समीकरण

दुसरीकडे आयपीएलच्या पॉईंट टेबलवर नजर टाकल्यास सध्या कोलकाता ११ सामन्यांत ८ विजयांसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे आणि आधीच प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. त्यांचा पुढील सामना ११ मे रोजी इडन्स गार्डन येथे मुंबई इंडियन्सशी होणार आहे. दरम्यान, त्यांचे शेवटचे दोन सामने १३ मे रोजी अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि १९ मे रोजी गुवाहाटी येथे राजस्थान रॉयल्स यांच्याशी होतील.

हे ही वाचा<< मुंबई इंडियन्स विजयी पण रोहित शर्माचा ड्रेसिंग रूममधील Video पाहून चाहतेही दुःखी; कॅमेऱ्याने टिपले डोळ्यातील भाव

सध्याची आकडेवारी पाहता केकेआरसह १६ पॉईंट्ससह राजस्थान रॉयल्स व १४ पॉईंट्ससह सनरायजर्स हैदराबाद टॉप तीन स्थानी आहे. चौथ्या स्थानासाठी १२ पॉईंट्स प्रत्येकी असलेल्या सीएसके, पंजाब किंग्स व लखनौ सुपर जाएंट्समध्ये मुख्य लढत असणार आहे.