आयपीएलवर करोनाचे संकट आल्याने २०२२ मध्ये या फ्रेंचायझी क्रिकेट लीगचे सामने मुंबई आणि पुणे या दोन शहरांमध्ये खेळले गेले. करोनाचे संसर्गाचे प्रमाण कमी झाल्याने यंदाचा टाटा आयपीएल २०२३ मधील टी-२० क्रिकेट देशभरातील १२ वेगवेगळ्या स्टेडिअम्समध्ये खेळले जाणार आहेत. बीसीसीआयद्वारे दिलेल्या माहितीनुसार, आयपीएलच्या सोळाव्या हंगामामधील सामन्यांची एकूण संख्या ७४ (७० लीग आणि ४ प्ले ऑफ) आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, जयपूर, हैदराबाद, अहमदाबाद, बंगळुरु, मोहाली, लखनऊ यांच्यासह गुवाहाटी व धर्मशाला येथेही आयपीएलच्या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामामध्ये मुंबई, लखनऊ, कोलकाता, राजस्थान आणि दिल्ली हे संघ एका गटामध्ये, तर चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद, पंजाब आणि गुजरात हे संघ दुसऱ्या गटात असणार आहेत. प्रत्येक संघाला होम ग्राऊंडवर ७ तर बाहेरच्या स्टेडिअममध्ये ७ असे एकूण १४ सामने खेळावे लागणार आहेत. दोन महिने चालणाऱ्या या लीगमध्ये १८ डबल हेडर सामने असणार आहेत.