Virat Kohli on Rilee Rossouw : गुरुवारी झालेल्या आयपीएल २०२४ च्या सामन्यात आरसीबीने पंजाब किंग्जचा ६० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. यासह पंजाब किंग्सचा संघ आयपीएल २०२४ मधील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या सामन्यादरम्यान आरसीबीचा स्फोटक फलंदाज विराट कोहली आणि पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज रायली रुसो यांच्यात मजेदार लढत पाहायला मिळाली. या सामन्यात अर्धशतक झळकावल्यानंतर रायली रुसोने गुडघ्यावर बसत बॅटने हातात बंदूक पकडल्यासारखे करुन सेलिब्रेशन केले. त्यानंतर विराट कोहलीने रायली रुसोची विकेट पडल्यानंतर त्याच शैलीत चोख प्रत्युत्तर दिले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने गुरुवारी खेळल्या गेलेल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ विकेट गमावत २४१ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाब किंग्जने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या गोलंदाजांनाही त्यांच्या स्फोटक फलंदाजीने थक्क केले. पंजाब किंग्जचा स्फोटक फलंदाज रायली रुसोने अवघ्या २१ चेंडूत अर्धशतक झळकावले. अर्धशतक झळकावल्यानंतरच रायली रुसोने गुडघ्यावर बसत बॅटने बंदुकीचे हावभाव करून आनंद साजरा केला. यानंतर विराट कोहलीनेही रायली रुसोच्या ‘गन शूट’ सेलिब्रेशनला चोख प्रत्युत्तर दिले.

विराटने दिले चोख प्रत्युत्तर –

विराट कोहलीनेही रायली रुसोच्या ‘गन शूट’ सेलिब्रेशनला त्याच्याच शैलीत प्रत्युत्तर दिले. पुढच्याच षटकात आरसीबीचा फिरकीपटू कर्ण शर्माने ६१ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येवर रायली रुसोला बाद केले. कर्ण शर्माच्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करत असताना विल जॅकच्या हाती झेलबाद झाला. रायली रुसोआऊट झाल्यानंतर डगआऊटच्या दिशेने परतत असताना विराट कोहलीनेही ‘गन शॉट’ सेलिब्रेशन करत त्याला चोख प्रत्युत्तर दिले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हेही वाचा – PBKS vs RCB : पंजाबची धाव प्राथमिक फेरीपुरतीच; बंगळुरूचा मोठा विजय

विराट कोहली आणि रजत पाटीदार यांच्या अर्धशतकांच्या खेळीनंतर गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीमुळे आरसीबीने पंजाब किंग्जचा ६० धावांनी पराभव करून प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. या सामन्यात विराट कोहलीने केवळ ४७ चेंडूत ९२ धावा केल्या. विराट कोहलीने आपल्या खेळीत ७ चौकार आणि ६ षटकार मारले. या काळात त्याचा स्ट्राईक रेटही १९५.७४ होता. त्याने आयपीएल २०२४ च्या १२ सामन्यांमध्ये १५३.५१ च्या स्ट्राइक रेटने ६३४ धावा केल्या आहेत. त्यामुळे विराट कोहलीकडे ऑरेंज कॅप कायम आहे. तो आयपीएल २०२४च्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे.