पुण्यातील कसोटीत भारतीय संघाचा पराभव विराट कोहलीच्या जिव्हारी लागला आहे. यापुढील सामन्यांमध्ये आमच्याकडून पुण्यातील कसोटीसारखा वाईट खेळ होणार नाही. आम्ही पुन्हा जोमाने उभे राहू, अशी ग्वाही कर्णधार विराट कोहली याने दिली आहे.

भारतीय संघ बंगळुरूत शनिवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱया कसोटीला सामोरा जाणार आहे. मालिकेतील पहिल्या कसोटीत भारतीय संघाचा तब्बल ३३३ धावांनी पराभव झाला होता. भारतीय संघाचा दोन्ही डावात अनुक्रमे १०५, १०७ असा आटोपता खेळ झाला होता. बंगळुरू कसोटीच्या पूर्वसंध्येला कोहलीने पत्रकारांशी बातचीत करताना पुढील योजना आणि विविध मुद्द्यांवर भाष्य केले. कोहली म्हणाला की, पराभव हा नेहमी काहीतरी शिकवत असतो. त्यामुळे तो मनाला लागलाच पाहिजे. पराभवाकडे दुर्लक्ष केले तर त्यातून आपल्याला शिकता येणार नाही. पराभवाने नक्कीच दु:खी झालो. समोरचा संघ चांगला खेळला, पण आमच्यातही काही त्रुटी राहिल्या हे मान्य करायला हवे.

पहिल्या कसोटीत संघाने चांगली कामगिरी केली नाही. आम्ही स्वत:मध्ये सुधारणा नक्की करू आणि पुन्हा जोमाने उभे राहू, असेही कोहली म्हणाला. एका सामन्यात खराब कामगिरी झाली म्हणून प्रत्येक सामन्यात आमच्याकडून तशीच कामगिरी होईल असे नाही, पुढच्या सामन्यात नक्कीच चांगली कामगिरी करू असा ठाम विश्वास कोहलीने व्यक्त केला.

दरम्यान, दुसऱया कसोटीच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघाने नेटमध्ये भरपूर घाम गाळला. कर्णधार कोहलीनेही खूप सराव केला. ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या कसोटीतील संघ बंगळुरू कसोटीसाठी देखील कायम ठेवण्यात आला आहे.