पीटीआय, पोचेफस्ट्रोम
मुमताज खानच्या हॅट्ट्रिकच्या बळावर भारतीय महिला हॉकी संघाने मंगळवारी मलेशियाला ४-० अशा फरकाने पराभूत करत ‘एफआयएच’ कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेच्या साखळी फेरीत अपराजित राहण्याची किमया साधली.
आता उपांत्यपूर्व फेरीत भारताचा शुक्रवारी दक्षिण कोरियाशी सामना होईल. भारताकडून मुमताजने (१० वे, २६ वे, ५९ वे मि.) चमकदार कामगिरी केली. संगीता कुमारीने (११ वे मि.) एक गोल केला. ‘ड’ गटात भारताने आपले तीनही सामने जिंकत अग्रस्थान मिळवले. यापूर्वी भारताने वेल्सला ५-१ तर, जर्मनीला २-१ असे पराभूत केले.
मुमताजने १०व्या मिनिटाला मलेशियाच्या बचावपटूला चकवत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्याच्या पुढच्याच मिनिटाला संगिताने गोल करत संघाची आघाडी दुप्पट केली. भारताला दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. पण त्याचा फायदा संघाला उचलता आला नाही. २६व्या मिनिटाला मुमताजने आणखी एक गोल करत संघाला मध्यंतरापर्यंत ३-० अशी मजबूत आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या सत्रात मलेशियाकडून गोल करण्याचे प्रयत्न झाले. पण भारतीय बचावफळीने ते हाणून पाडले. सामना संपण्याच्या काही वेळ आधी मुमताजने तिसरा गोल केला.