भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष राजीव मेहता यांची ग्वाही

खो-खो खेळाचा प्रसार अनेक देशांमध्ये व्यापक प्रमाणात होत आहे. त्यामुळे विश्वचषक खो-खो स्पर्धा आणि खो-खो प्रीमियर लीग यंदाच्या वर्षांतच होणार असल्याची ग्वाही भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे (आयओए) सरचिटणीस राजीव मेहता यांनी दिली.

विश्वचषक स्पध्रेबाबत माहिती देताना मेहता म्हणाले की, ‘‘दक्षिण आशियाई (सॅफ) क्रीडा स्पध्रेतसुद्धा खो-खोचा समावेश होता. त्यात आठ देश सहभागी झाले होते. लवकरच आशियाई ऑलिम्पिक परिषदेची आम्हाला मान्यता मिळणार आहे. या खेळाला जागतिक स्तरावर आम्हाला घेऊन जायचे आहे. हा खेळ दिवसेंदिवस लोकप्रिय होत असल्यामुळे चालू वर्षांतच विश्वचषक स्पर्धा होण्याची दाट शक्यता आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘विश्वचषकासाठी आवश्यक किमान देशांचा आकडा आमच्या खेळाकडे आहे. हा आकडा वीसच्या जवळपास आहे. आशियाई खंडाबाहेर अमेरिका, कॅनडा याचप्रमाणे काही युरोपियन देशांमध्येसुद्धा खेळाच्या प्रचार-प्रसाराचे कार्य सुरू आहे. एकंदर खो-खो खेळ हा २७ देशांपर्यंत पोहोचला आहे.’’

खो-खो खेळातील लीग केव्हा अवतरणार, या प्रश्नाला उत्तर देताना मेहता यांनी सांगितले, ‘‘राष्ट्रीय दर्जाची एक लीग असावी, असे स्वप्न या खेळात अनेक वष्रे जोपासले आहे. या खो-खो प्रीमियर लीगची मुहूर्तमेढसुद्धा याच वर्षी रोवली जाईल. लीगसंदर्भात तीन-चार कंपन्यांशी संघटनात्मक स्तरावर बोलणी सुरू आहेत. लवकरच त्यावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. खेळाडूंना उत्तम पैसा आणि सुविधा देऊ शकणाऱ्या कंपनीकडे आम्ही या लीगचे हक्क देऊ.’’

संघटनात्मक समस्येचे निदान ‘आयओए’च्या घटनेतच ‘‘संघटनात्मक समस्या जशी भारताला भेडसावते आहे, तसाच तो सर्वच देशांनासुद्धा चिंतेचा विषय ठरत आहे. आयओएच्या घटनेमध्ये प्रत्येक समस्येचे निदान आहे. मात्र घटनेच्या प्रक्रियेनुसार आपण गेल्यास न्यायालयात जाण्याची मुळीच आवश्यकता नाही. जी मंडळी थेट न्यायालयात जातात, त्यांनी सर्वप्रथम ऑलिम्पिक संघटनेकडे आधी दाद मागावी. त्यांच्या समस्या आमच्या व्यासपीठावर सुटू शकतील,’’ असे आवाहन मेहता यांनी केले. ‘‘निवडणूक हरलेली मंडळी अद्याप संघटनेचा ताबा सोडत नसल्याचे दिसून आलेले आहे. हे खेळासाठी योग्य नाही. कोणत्याही संघटनेवर अन्याय होऊ देणार नाही. मला कुणाहीविरुद्ध लढावे लागले तरी चालेल. ज्यांच्याकडे बहुमत असेल, त्यांच्यासोबतच आयओए असेल,’’ अशी ग्वाही मेहता यांनी दिली.

 

भारताची इंग्लंडवर मात

मुंबई : खो-खो खेळाच्या प्रसारासाठी आयोजित इंग्लंड संघाविरुद्धच्या खो-खो मालिकेत भारतीय संघाने २५-२० असा ५ गुणांनी विजय मिळवला. युरोपात खेळाचा विकास व्हावा या उद्देशाने तीन सामन्यांची मालिका आयोजित करण्यात आली आहे.

नवी मुंबईतील कोपरखैरणे येथील रा.फ. नाईक विद्यालयाच्या पटांगणावर झालेलया लढतीला मोठय़ा संख्येने चाहत्यांनी पाठींबा दिला. भारतातर्फे संकेत कदमने ४ तर हर्षद हातणकरने ३ गडी बाद केले. इंग्लंड संघाकडून सचिन मोमाने ४ गडी बाद केले. पुढील सामने दिल्ली आणि अजमेर येथे होणार आहेत. मुख्य सामन्याआधी झालेल्या प्रदर्शनीय लढतीत मुंबई उपनगरने ठाण्यावर १ गुण व २.२० मिनिटे राखून विजय मिळवला.