भारताचे माजी कसोटीपटू व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांना नव्या दमाच्या फिरकीपटूंनी प्रभावित केल्याचे दिसते. युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव यांनाच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रत्येक सामन्यात संधी द्यावी, असा सल्ला त्यांनी भारतीय टीमला दिलाय. अक्षर पटेलच्या दुखापतीनंतर रवींद्र जाडेजाचा भारतीय संघात समावेश करण्यात आला असला तरी त्याला संधी देण्याचा विचार करण्यापेक्षा युजवेंद्र आणि कुलदीपलाच खेळवायला हवे, असे मत त्यांनी ‘टाईम्स ऑफ इंडिया’मध्ये लिहिलेल्या लेखातून व्यक्त केलं.

या दोन्ही फिरकीपटूंकडे मनगटाच्या सहाय्याने चेंडू वळवण्याची क्षमता आहे. त्यामुळे त्यांना विकेट मिळण्याची शक्यता जास्त आहे. हार्दिक पांड्याप्रमाणे ते या मालिकेत छाप सोडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. पहिल्या एकदिवसीय सामन्यात युजवेंद्र चहलने भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या होत्या. पाच षटकात ३० धावा देऊन त्याने तीन बळी मिळवले. त्याने ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स यांना तंबूचा रस्ता दाखवला होता. तर कुलदीपने सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि मार्कस स्टोइनीस यांना बाद करत भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला होता.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना गुरुवारी ईडन गार्डनच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात संघात बदल होण्याची शक्यता वाटत नाही. हार्दिक पांड्या अष्टपैलूची भूमिका चोखपणे पार पाडत असल्यामुळे जाडेजाला संधी मिळणे कठीणच दिसते. पण तरी दुसऱ्या सामन्यात कोहली संघात बदल करणार का? हे सामन्याच्या दिवशीच कळेल.