भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या बहुचर्चित निवडणुकीला शनिवारी नाटय़मय वळण मिळाले. यापुढे काम करण्यासाठी आपले अंत:करण तयार नसल्याचे सांगून एस. वाय. कुरेशी यांनी निवडणूक समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळे आता देशातील सर्वोच्च क्रीडा संघटनेच्या निवडणुकीत पेचप्रसंग उभा राहिला आहे.
२५ नोव्हेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या आठवडाआधीच निवडणूक आयोगाचे माजी प्रमुख कुरेशी यांनी राजीनामा दिल्यामुळे निवडणूक संकटात आली आहे. राजीनामा देताना कुरेशी यांनी म्हटले की, ‘‘निवडणुकीसाठी आयओएने वैयक्तिक समिती नेमली, याचे कौतुक आहे. पण सुरुवातीला सरकारची क्रीडा मार्गदर्शक तत्वे स्वीकारणाऱ्या आयओएने नंतर ती अनुसरण्यास नकार दिल्यामुळे या पदावर राहण्याची माझी इच्छा नाही. क्रीडा सचिव म्हणून माझ्या कालखंडात मी नेहमीच सरकारची मार्गदर्शक तत्वे अवलंबली होती. पण आयओएने मार्गदर्शक तत्वे धुडकावून लावल्यामुळे माझे अंत:करण हे काम करण्याची अनुमती देत नाही.’’
या तीनसदस्यीय समितीत कुरेशी यांच्यासह केरळ उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश व्ही. के. बाली आणि दिल्ली उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश जे. डी. कपूर यांचा समावेश आहे. सरकारच्या क्रीडा मार्गदर्शक तत्वानुसार, आयओएच्या अधिकाऱ्यांवर वय आणि कालमर्यादेचे बंधन येणार आहे. पण ही निवडणूक सरकारच्या नव्हे तर ऑलिम्पिक आचारसंहितेनुसार होईल, असे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) शुक्रवारी स्पष्ट केले.
कुरेशी यांचे राजीनामापत्र मिळाल्याचे आयओएचे हंगामी अध्यक्ष व्ही. के. मल्होत्रा यांनी स्पष्ट केले असून आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘आयओएची भूमिका अगदी स्पष्ट आहे. सरकारची मार्गदर्शक तत्वे अनधिकृत आणि घटनाबाह्य़ आहेत, असे आम्ही यापूर्वीपासूनच सांगत आलो आहोत. पण उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्हाला त्याचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे आमच्यासमोर गोंधळाची स्थिती आहे. ऑलिम्पिक आचारसंहितेनुसार ही निवडणूक व्हावी, असे आयओसीचे म्हणणे आहे तर सरकार आणि उच्च न्यायालयाने आमच्यावर मार्गदर्शक तत्वे अवलंबण्याची सक्ती केली आहे.’’ या समितीत कुरेशी यांच्या जागी दुसरा योग्य उमेदवार मिळेपर्यंत निवडणूक पुढे ढकलली जाण्याचे संकेत मिळत आहेत.