विम्बल्डन टेनिस स्पर्धेचा महिलांचा अंतिम मुकाबला फ्रान्सच्या मारियन बाटरेली आणि जर्मनीच्या सबिन लिसिकी यांच्यात रंगणार आहे. उत्कंठावर्धक लढतीत लिसिकीने पोलंडच्या अग्निझेस्का रडवान्स्कावर ६-४, २-६, ९-७ अशी मात करत अंतिम फेरीत मजल मारली. चौथ्या फेरीत सेरेना विल्यम्सला पराभवाचा धक्का देणारी लिसिका तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्ये ०-३ अशी पिछाडीवर होती. मात्र त्यानंतर ताकदवान सव्‍‌र्हिस, जबरदस्त जमिनीलगतचे फटके यांच्या जोरावर लिसिकीने रडवानस्काचे आव्हान मोडून काढले. १९९९नंतर विम्बल्डनच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारी लिसिकी पहिली जर्मन खेळाडू ठरली आहे.
बाटरेलीने बेल्जियमच्या कर्स्टन फ्लिपकेन्सचा ६-१, ६-२ असा धुव्वा उडवत अंतिम फेरीत स्थान मिळवले. २००७मध्ये विम्बल्डनच्या अंतिम लढतीत व्हीनस विल्यम्सकडून पराभूत झाल्याने बाटरेलीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. हा इतिहास बदलण्याची शनिवारी बाटरेलीला संधी मिळणार आहे.