|| ऋषिकेश बामणे

आठवडय़ाची मुलाखत – शरथ कमल, भारतीय टेबल टेनिसपटू

कमलेश मेहता यांच्यासारख्या मातब्बर माजी टेबल टेनिसपटूंचा विक्रम मोडल्याने मी नक्कीच आनंदी आहे. मात्र विक्रमापेक्षा माझे प्रमुख लक्ष्य हे ऑलिम्पिकसाठी पात्र ठरण्याचे असून त्या दृष्टीनेच मी आतापासूनच अथक परिश्रम घेत आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू शरथ कमल याने व्यक्त केली.

जानेवारी महिन्यात झालेल्या राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत शरथने मेहता यांच्या आठ राष्ट्रीय विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढून नववे विजेतेपद पटकावले. पद्मश्री पुरस्कार विजेता एकमेव टेबल टेनिसपटू शरथने या वर्षांच्या अखेपर्यंत अव्वल २० खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्याचे ध्येय डोळ्यांसमोर ठेवले आहे. भारतातील टेबल टेनिसला गेल्या काही वर्षांत चांगले दिवस आले आहेत, असे मत मांडणाऱ्या शरथशी भविष्यातील आव्हाने व खेळाच्या सद्य:परिस्थितीविषयी केलेली ही खास बातचीत.

  • सध्याच्या घडीला तू भारतातील सर्वाधिक अनुभवी व अव्वल क्रमांकाचा टेबल टेनिसपटू आहेस. तुझ्या नव्या विक्रमाविषयी काय सांगशील?

खरे सांगायचे तर मी कमलेश सरांना पाहूनच टेबल टेनिस शिकलो. ते जेव्हा त्यांची अखेरची राष्ट्रीय स्पर्धा जिंकले, त्या वेळी मी अवघ्या नऊ वर्षांचा होतो. प्रशिक्षक म्हणून त्यांचे माझ्या आयुष्यात मोलाचे योगदान आहे. त्यांचा विक्रम मोडण्याचा कधीही विचार केला नव्हता. येणाऱ्या काळात माझाही विक्रम मोडला जाईल, पण यामुळे भारतातील टेबल टेनिसचीच प्रगती होणार आहे. सर्वाधिक अनुभवी खेळाडू म्हणून संघातील सर्वाना स्वत:च्या कामगिरीद्वारे प्रोत्साहन करण्यासाठी मी नेहमीच तयार आहे.

  • ऑलिम्पिकसाठी कशा प्रकारे तयारी सुरू आहे व त्यापूर्वी कोणत्या स्पर्धेवर विशेष लक्ष आहे?

एप्रिल महिन्यात होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद टेबल टेनिस स्पध्रेत विजेतेपद मिळवण्याचे माझे ध्येय आहे. मात्र ऑलिम्पिक पात्रता फेरी गाठण्याचे माझे मुख्य लक्ष्य आहे, किंबहुना पात्रता फेरीचा अडथळा ओलांडणे अधिक आव्हानात्मक असते. त्यामुळे गेल्या महिन्यापासूनच मी पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता फेरीसाठी योजना आखली असून त्यानुसार सराव करत आहे. ऑलिम्पिकच्या दृष्टीने हे वर्ष सर्वाधिक महत्त्वाचे असल्याने गरज पडल्यास काही स्पर्धामधून मला माघारदेखील घ्यावी लागू शकते. आजपर्यंत भारताला एकही ऑलिम्पिक पदक जिंकता आलेले नाही, मात्र २०२०च्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये पदकांचा दुष्काळ संपवण्यासाठी मी उत्सुक आहे.

  • ऑलिम्पिकमध्ये कोणत्या गटात पदक मिळवण्याच्या सर्वाधिक आशा आहेत, असे तुला वाटते?

पुढील वर्षी प्रथमच ऑलिम्पिकमध्ये मिश्र दुहेरीचा समावेश करण्यात येणार आहे. मी व मनिका बत्रा या फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार असून त्यामध्ये पदक मिळवण्याच्या अधिक आशा आहेत. आशियाई क्रीडा स्पध्रेमध्येसुद्धा आम्ही मिश्र दुहेरीत कांस्यपदक जिंकण्याची किमया साधली होती. मात्र यामुळे एकेरीकडे दुर्लक्ष होणार नाही, याचीही मी काळजी घेईन.

  • टेबल टेनिसच्या पायाभूत सुविधांविषयी तुझे काय मत आहे?

मागील काही वर्षांच्या तुलनेत टेबल टेनिसला आता फार उत्तम सोयीसुविधा मिळत आहेत. गेल्या वर्षांपासून सुरू झालेले खेलो इंडिया, अल्टिमेट टेबल टेनिस लीग अशा स्पर्धाना त्याचे श्रेय द्यावे लागेल. त्याशिवाय शालेय स्तरावरदेखील टेबल टेनिसच्या विविध वयोगटांतील स्पर्धा भरवण्यात येत आहेत. कौशल्य दाखवण्यासाठी मंच उपलब्ध झाल्याने अनेक युवा या खेळात कारकीर्द घडवण्यासाठी स्वत:हून पुढे सरसावले आहेत. जी. साथियन, मनिका बत्रा यांच्याव्यतिरिक्त कुमार व किशोर गटातूनही मानव ठक्कर, दिया चितळे यांसारखे उत्तम खेळाडू उदयास येत आहेत.

  • सततच्या वाढत्या स्पर्धामुळे खेळावर व शरीरावर परिणाम जाणवतो का?

वयाची पस्तिशी ओलांडल्यामुळे मी सर्वच स्पर्धात खेळू शकत नसलो तरी दर वर्षी विविध पातळ्यांवरील किमान सात ते आठ टेबल टेनिस स्पर्धा खेळतो; परंतु प्रत्येक खेळाडूने त्याच्या तंदुरुस्ती व प्राधान्यानुसार कोणत्या स्पर्धामध्ये खेळायचे, हे ठरवले पाहिजे. युरोपियन स्पर्धामध्ये तुम्हाला आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांचे मार्गदर्शन व खेळाडूंसह खेळण्याची संधी मिळते. त्यामुळे एखाददुसऱ्या वेळी एखादी राष्ट्रीय स्पर्धा वगळून तेथील वातावरणात खेळण्याला पसंती दिल्यास काहीच गैर नाही.