फेलिप मासा आणि व्हॉल्टेरी बोट्टास ही जोडी फॉम्र्युला-वनच्या सलग तिसऱ्या वर्षांत विल्यम्स संघासोबत शर्यतीत उतरणार आहे. मासा आणि बोट्टास हे फॉम्र्युला-वन शर्यतपटूंच्या यादीत अनुक्रमे पाचव्या व सहाव्या स्थानावर विराजमान आहेत.
फेरारी संघ बोट्टासला करारबद्ध करण्यासाठी इच्छुक असल्याच्या वावडय़ा गेले काही महिने सुरू होत्या, परंतु फेरारीने किमी सैकोनेन याच्या करारात वाढ करून या वावडय़ांना पूर्णविराम दिला. ‘‘फॉम्र्युला-वन शर्यतीतील संघासाठी स्थिरता असणे हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या सत्रात अव्वल शर्यतपटूंमध्ये मोडणाऱ्या मासा व बोट्टास यांच्यासोबत पुन्हा सर्किटवर उतरण्यासाठी उत्सुक आहोत,’’ अशी प्रतिक्रिया विल्यम्स संघाचे मुख्य फ्रँक विल्यम्स यांनी दिली.
३४ वर्षीय ब्राझीलच्या मासाने २०१४मध्ये फेरारी संघ सोडून विल्यम्स संघाशी करार केला आणि त्याने संघासोबत एक पोल पोझिशन आणि चार वेळा अव्वल तिघांत येण्याची किमया साधली, तर २६ वर्षीय फिनलँडच्या बोट्टासने गेल्या दोन सत्रात सात वेळा अव्वल तिघांमध्ये स्थान मिळवले आहे. ‘‘विल्यम्सने मला खूप सन्मान दिला आणि आपल्या कामगिरीतून त्याची परतफेड करण्याची पुरेपूर प्रयत्न केला,’’ अशी प्रतिक्रिया मासाने दिली.