मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून (बीसीसीआय) आयोजित करण्यात येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत सामन्यांसाठी मुख्य प्रायोजक म्हणून ‘पेटीएम’ची जागा ‘मास्टरकार्ड’ घेणार आहे. ‘बीसीसीआय’ने सोमवारी आपल्या संकेतस्थळावर याबाबतची घोषणा केली.

‘पेटीएम’ २०१५ सालापासून ‘बीसीसीआय’चे मुख्य प्रायोजक होते. २०१९ मध्ये त्यांच्याशी पुन्हा नव्याने करारही करण्यात आला होता. मात्र काही काळापूर्वी ‘पेटीएम’ने या करारातून मुक्त होण्याची विनंती केली होती. ‘बीसीसीआय’ने त्यांची ही विनंती मान्य केली असून आता ‘मास्टरकार्ड’शी २०२२-२३ हंगामासाठी करार केला आहे.   

मुख्य प्रायोजकत्व मिळवण्यासाठी २०१५ मध्ये ‘पेटीएम’ने ‘बीसीसीआय’शी चार वर्षांकरता एकूण २०३ कोटी रुपयांचा (२.४ कोटी प्रति सामना) करार केला होता. त्यानंतर ऑगस्ट २०१९ मध्ये पुन्हा नव्याने करार करण्यात आला. ‘पेटीएम’ने २०२३ सालापर्यंत ‘बीसीसीआय’चे मुख्य प्रायोजकत्व मिळवण्यासाठी प्रति सामना ३.८० कोटी रुपयांची विजयी बोली लावली होती. आता ‘मास्टरकार्ड’ने ‘पेटीएम’ची जागा घेतली असली, तरी करारातील रकमेमध्ये बदल होणार नाही.