भारतासारख्या क्रिकेटप्रेमी देशात सामनानिश्चिती हा फौजदारी गुन्हा असायला हवा. कोणतेही कडक कायदे नसल्यामुळे पोलीसही एक हात मागे बांधल्याप्रमाणे याप्रकरणी चौकशी करतात, असे मत आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी स्टीव्ह रिचर्डसन यांनी व्यक्त केले.

भारतात सामनानिश्चितीप्रकरणी फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी कित्येक वर्षांपासून कायदेतज्ज्ञांकडून होत आहे. मात्र देशात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या या खेळातील भ्रष्टाचाराची चौकशी करताना पोलीस अधिकाऱ्यांचे हात बांधलेले असतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

भारतात येत्या तीन वर्षांत आयसीसीच्या दोन प्रतिष्ठेच्या स्पर्धा आयोजित केल्या जाणार आहेत. त्यामुळे भारतानेही सामनानिश्चिती हा फौजदारी गुन्हा करावा, अशी मागणी भारत सरकारकडे केली आहे.

याक्षणी सामनानिश्चितीसाठी कोणतेही कायदे नाहीत. भारतीय पोलीस खात्याशी आमचे चांगले संबंध आहेत. मात्र एक हात पाठीमागे बांधल्याप्रमाणे ते या प्रकरणी चौकशी करतात. भ्रष्टाचार करणाऱ्यांची पाळेमुळे उपटून काढण्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. मात्र भारतीय पोलीस खात्यातील अधिकाऱ्यांना मोकळेपणाने कारवाई करण्याची संधी दिली तर आम्ही भ्रष्टाचार करणाऱ्यांना सळो की पळो करून सोडू. मात्र भारतातील कायद्यांतील पळवाटा आम्हाला गुन्हेगारांपर्यंत पोहोचू देत नाहीत. सध्या आमच्याकडे भ्रष्टाचाराची ५० प्रकरणे आहेत. या सर्वाची पाळेमुळे भारतातील भ्रष्टाचार करणाऱ्यांशी जोडली गेली आहेत.

– स्टीव्ह रिचर्डसन, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे समन्वयक