बॉल टॅम्परिंग प्रकरणामुळे ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये मोठं वादळ आलेलं पाहायला मिळत आहे. संपूर्ण क्रिकेट जगतातून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. कर्णधार स्टिव्ह स्मिथला एका सामन्यासाठी आयसीसीने निलंबीत केलं असून त्याला कर्णधारपदाचाही राजीनामा द्यावा लागला आहे. स्मीथ आणि वॉर्नरवर आजीवन बंदीची मागणीही जोर धरत आहे. अशा परिस्थितील तात्पुरत्या स्वरूपात संघाचं नेतृत्व टीम पेन याच्याकडे देण्यात आलंय. पण पुढील कर्णधार म्हणून अचानक माजी कर्णधार मायकल क्लार्क याचं नाव चर्चेत आलं आहे. कारण, ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटला आवश्यकता असेल तर कर्णधारपदी परतेन असे मत स्वतः क्लार्कने व्यक्त केले आहे.

36 वर्षीय मायकल क्लार्कने 2015 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. 115 कसोटी सामन्यांमध्ये त्याने देशाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. सध्या तो ऑस्ट्रेलियाच्या नाइन नेटवर्कसाठी समालोचकाची भूमिका पार पाडतो आहे.

बॉल टॅम्परिंगच्या प्रकरणानंतर कर्णधारपद तुझ्याकडे देण्यात आले तर स्वीकारशील का या प्रश्नाला उत्तर देताना जर मला योग्य व्यक्तीने हा प्रश्न विचारला , तर मी याबाबत जरूर विचार करीन असं क्लार्क म्हणाला . मला प्रामाणिकपणे वाटते की स्मिथने अत्यंत मोठी आणि गंभीर चूक केली आहे पण या प्रकारानंतर एखादा मार्ग निघेल आणि स्मिथ कर्णधारपदी कायम राहील अशी मला अपेक्षा असल्याचंही क्लार्क म्हणाला.