बुद्धिबळ जगत गेली अनेक वष्रे ज्या लढतीची उत्सुकतेने प्रतीक्षा करत होते, त्या महासंग्रामाची सुरुवात आज चेन्नईमध्ये होत आहे. दुपारी ठीक ३ वाजता, ज्या वेळी मॅग्नस कार्लसन पांढऱ्या मोहऱ्यांनिशी आपली पहिली चाल करेल, त्या वेळी जगातील सुमारे १५० देशातील लाखो बुद्धिबळप्रेमी आपल्या संगणकासमोर श्वास रोखून बसले असतील.
गॅरी कास्पारोव्हच्या अकाली निवृत्तीनंतर व्हॅसेलिन टोपालोव वगळता कोणालाही आनंदने जगज्जेतेपदाच्या जवळही फिरकू दिले नव्हते. पण अचानक एखाद्या धूमकेतूप्रमाणे बुद्धिबळाच्या क्षितिजावर मॅग्नसचा उदय झाला आणि त्याने आनंदच्या साम्राज्याला धक्के देण्यास सुरुवात केली.
आनंदचा जलदगती बुद्धिबळात कोणीही हात धरू शकत नसे. किंबहुना एखाद्या मशीनगनप्रमाणे येणाऱ्या आनंदच्या खेळ्या प्रतिस्पध्र्याला गारद करून टाकत असत. त्यामुळे २००९ साली मॉस्को येथे झालेल्या विद्युतगती बुद्धिबळ जागतिक अजिंक्यपद स्पध्रेत मॅग्नसने आनंदचा जगज्जेतेपदाचा मुकुट हिरावून घेतला, याची नोंद जगाने घेतली. मुख्य म्हणजे त्याने निव्वळ आनंदच नव्हे तर माजी जगज्जेता व्लादिमिर क्रॅमनिक, सर्गेइ कार्याकिन, पीटर स्वीडलर यांसारख्या महारथींना मॅग्नसने पांढऱ्या आणि काळ्या या दोन्ही मोहऱ्यांसह अस्मान दाखवले होते. त्यानंतर मॅग्नस कार्लसनने एकामागून एक स्पर्धा जिंकण्याचा धडाका लावला. जागतिक क्रमवारीत त्याने सर्वाना खूप मागे टाकले आणि गॅरी कास्पारोव्हचा विक्रम पार केला. त्याचा दबदबा सर्वत्र पसरला आणि आनंदला जर कोणी हरवू शकेल तर तो कार्लसन, अशी लोकांची भावना झाली.
पुढील महिन्यात आपल्या वयाची ४४ वष्रे पूर्ण करणारा आनंद २२ वर्षांच्या नवयुवकाला कसा तोंड देणार, असे अनेकांना वाटणे साहजिक आहे. परंतु स्पर्धा खेळणे आणि एकाच प्रतिस्पध्र्याशी अनेक डावाचा सामना खेळणे यात खूप फरक आहे. येथे तुम्हाला अनेक मदतनीस असतात आणि तुम्हाला प्रतिस्पध्र्याच्या चुकांचा अभ्यास करायला भरपूर वेळ मिळतो. अनेक वेळा अनातोली कार्पोव आणि गॅरी कास्पारोव्ह यांच्यासारख्या दिग्गजांशी लढून आनंदला जो अनुभव मिळाला आहे, त्यामुळे त्याला मॅग्नसशी लढणे इतके कठीण जाऊ नये.
गेल्या वर्षी प्राग येथील आंतरराष्ट्रीय स्पध्रेत मला ग्रँडमास्टर सीमॉन अग्दस्टिन भेटला होता. सीमॉन हा  मॅग्नसचा पहिला प्रशिक्षक! त्यामुळे आमच्या संभाषणाची गाडी मॅग्नस या विषयाकडे वळणे स्वाभाविक होते. सीमॉनच्या मते मॅग्नस हा जगातील एकमेव खेळाडू आहे की जो एकीकडे टीव्ही बघत असताना बुद्धिबळाचा अभ्यास करतो आणि तरीही त्याला दोन्हीकडे जे चालले आहे ते पूर्णपणे लक्षात राहते!
अफाट स्मरणशक्ती आणि बुद्धिबळासाठी लागणारी पटकन निर्णय घेण्याची हातोटी दोन्ही खेळाडूंकडे आहे. एक जण आहे जगज्जेता आणि त्याचा आव्हानवीर आहे आजचा जगातील सर्वोत्तम खेळाडू! त्यामुळे हा सामना रंगणार हे नक्की!! आपण त्यांच्या खेळ्या, त्यामागचे विचार, त्यांची दबावाला तोंड देण्याची क्षमता या गोष्टींचा रोजच्या रोज आढावा घेऊ या..
बुद्धिबळाचा महासंग्राम!

चेन्नईत आजपासून विश्वनाथ आनंद विरुद्ध मॅग्नस कार्लसन या महाबळींमध्ये बुद्धिबळाचे महायुद्ध सुरू होत आहे. या दोन महावीरांची रणनीती, त्यामागचे विचार यांचा रंगतदार पट मांडणारा द्रोणाचार्य पुरस्काराने गौरविलेले प्रशिक्षक रघुनंदन गोखले यांचा स्तंभ आजपासून रोज..