दिल्ली विद्यापीठाची विद्यार्थीनी गुरमेहर कौर हिच्या फेसबुक पोस्टवरून सुरू झालेल्या वादावर ट्विट करणे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याला चांगलेच महागात पडताना दिसत आहे. क्रिकेटपटू गौतम गंभीर यानेही या प्रकरणाता उडी घेत सेहवागने व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे. गंभीरने गुरमेहनर कौरला पाठिंबा देत प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे आणि त्याची खिल्ली उडवणे ही लाजीरवाणी गोष्ट असल्याचे म्हटले आहे. गंभीरने आपल्या ट्विटर हॅण्डलवर एका व्हिडिओच्या माध्यमातून आपले मत व्यक्त केले. भारतीय लष्करासाठी माझ्या मनात खूप आदर आहे. देशासाठी जवानांकडून केली जाणाऱया सेवेची तुलना होऊ शकत नाही. पण सध्याच्या काही घटनांमुळे मी खूप निराश झालो. आपण लोकशाही असलेल्या देशात राहत असून प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. जेव्हा एखादी मुलगी आपल्या वडिलांना गमावल्यानंतर देशात शांती कायम राहण्यासाठीची इच्छा व्यक्त करत असेल तर तिला तसे करण्याचा अधिकार आहे. तिच्या मताची खिल्ली उडवणे म्हणजे तिचा अनादर करण्यासमान आहे, असे गंभीरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

वाचा: ‘त्या’ ट्विटचा गुरमेहरशी संबंध नाही, सेहवागचे स्पष्टीकरण

दरम्यान, सेहवागने आपण केलेल्या ट्विटचा गुरमेहर कौर प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट केले. मी केलेले ट्विट गुरमेहरला उद्देशून केले नव्हते. मी अगदी प्रांजळ मत व्यक्त केले होते. त्यामागे कोणावरही टीका करण्याचा उद्देश नव्हता. मात्र, काहींनी माझ्या ट्विटचा वेगळा अर्थ काढला, असे सेहवागने स्पष्टीकरण दिले होते.