भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपले पायउतार झालेले अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांच्यासाठी मोर्चेबांधणी करताना काही मुदतीची तरतूद करीत वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलण्याची योजना आखली आहे. चेन्नईत झालेल्या बीसीसीआयच्या सदस्यांच्या अनौपचारिक सभेमध्ये कार्यकारिणी समितीची सभा २६ सप्टेंबरला घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार चौकशी करणाऱ्या मुकुल मुद्गल समितीला आपला अंतिम अहवाल सादर करण्यासाठी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापर्यंतचा कालावधी लागेल. या पाश्र्वभूमीवर बहुतांशी सदस्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभा तोपर्यंत पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी मागणी केली होती. त्यामुळे बीसीसीआयपुढे पेचप्रसंग निर्माण झाला होता.
‘‘बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा ३० सप्टेंबरच्या आत होणार नाही,’’ अशी माहिती या बैठकीला हजर राहिलेल्या एका सदस्याने दिली. आयपीएल स्पॉट-फिक्सिंग आणि सट्टेबाजी प्रकरणातील चौकशीमुळे बीसीसीआयच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेले अध्यक्ष श्रीनिवासन यांनी आपले शक्तिप्रदर्शन करण्यासाठी या बठकीचे आयोजन केले होते.
बीसीसीआयने कार्यकारिणी समितीची सभा कधी होणार हे जरी निश्चित केले असले तरी वार्षिक सर्वसाधारण सभा मात्र ३० सप्टेंबरपूर्वी होऊ शकणार नाही. कारण नियमानुसार या दोन बैठकींमध्ये तीन आठवडय़ांचे अंतर असावे लागते.
‘‘वार्षिक सर्वसाधारण सभा नियोजित वेळेत होऊ शकणार नाही. श्रीनिवासन यांनी आयोजित केलेल्या या अनौपचारिक बैठकीला बीसीसीआयच्या ३१ सदस्यांपैकी १८ जण होते, तर तीन सदस्यांनी टेलीकॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली. यात हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे प्रतिनिधी आणि बीसीसीआयचे अंतरिम अध्यक्ष शिवलाल यादव यांचा समावेश होता. त्यामुळे श्रीनिवासन यांनी आपल्याकडे आताही बहुमत असल्याचा दावा केला आहे,’’ असे पदाधिकाऱ्याने सांगितले.
मुद्गल अहवालात तामिळनाडूचे नामांकित उद्योगपती श्रीनिवासन यांना निर्दोष ठरवल्यास ते सहजगत्या बीसीसीआयच्या अध्यक्षपदावर पुन्हा विराजमान होऊ शकतात. कारण त्यांना विरोध करू शकणारे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष शशांक मनोहर यांना फक्त चार संघटनांचा पाठिंबा मिळू शकेल.
बीसीसीआयची एकाधिकारशाही क्रिकेटसाठी घातक -बॉयकॉट
लंडन : काही दिवसांपूर्वीच महान क्रिकेटपटू इयान बॉथम यांनी इंडियन प्रीमिअर लीग रद्द करण्याची मागणी केली असतानाच बीसीसीआयची एकाधिकारशाही क्रिकेटसाठी घातक ठरत असल्याचे मत इंग्लंडचे माजी कर्णधार जेफ्री बॉयकॉट यांनी व्यक्त केले आहे. ‘‘अनेक जण क्रिकेटकडे आकर्षित होणे आणि गुंतवणूक करणे ही गोष्ट क्रिकेटसाठी चांगली बाब म्हणावी लागेल. पण भारतासारख्या एकाच देशाची एकाधिकारशाही ही क्रिकेटसाठी घातक बाब म्हणावी लागले. क्रिकेट संदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णय भारत हा देश घेत असल्याने अनेक देशांना त्याची भीती वाटत आहे,’’ असे बॉयकॉट म्हणाले.
..तर सर्वोच्च न्यायालयात जाईन -वर्मा
नवी दिल्ली : निर्धारित केलेल्या सप्टेंबरअखेपर्यंत भारतीय क्रिकेट नियामक मंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यात अपयशी ठरल्यास सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा इशारा आदित्य वर्मा यांनी दिला आहे. वर्मा यांनी म्हटले आहे की, ‘‘भारतीय क्रिकेटला समर्थ नेतृत्व नसल्यामुळे ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे बीसीसीआयने वार्षिक सर्वसाधारण सभा पुढे ढकलल्यास मी सर्वोच्च न्यायालयात जाईन.’’