बलात्काराच्या कथित आरोपांप्रकरणी ब्राझीलचा आघाडीचा फुटबॉलपटू नेयमार याची चौकशी सुरू होती. मात्र सबळ पुराव्यांअभावी ब्राझील पोलिसांनी हे प्रकरण बंद केल्याने नेयमारने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

साव पावलो अ‍ॅटर्नी जनरल कार्यालयाने याविषयीची माहिती दिली असून पोलिसांचा हा निर्णय मंगळवारी सरकारी वकिलांकडे पाठवण्यात येणार असून या प्रकरणाचे मूल्यमापन करण्यासाठी त्यांच्याकडे आता १५ दिवसांचा कालावधी असणार आहे. या प्रकरणाचा अंतिम निर्णय न्यायाधीश सुनावतील.

मे महिन्यात पॅरिस येथील एका हॉटेलमध्ये नेयमारने ब्राझीलच्या महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर लावण्यात आला होता. या आरोपांनंतर फुटबॉलवेडय़ा ब्राझीलमध्ये नेयमारच्या या कथित कृत्याविषयी जोरदार चर्चा रंगली होती. त्यामुळे कोपा अमेरिका स्पर्धेसाठी ब्राझीलच्या तयारीवरही या बातमीचा परिणाम झाला होता. २ जून रोजी हे प्रकरण उजेडात आल्यानंतर नेयमारने समाजमाध्यमांवर सात मिनिटांचा व्हिडीयो टाकला होता. बलात्काराच्या या आरोपाचे खंडन करताना नेयमारने या व्हिडीयोमध्ये व्हॉट्सअ‍ॅपवरून केलेल्या संभाषणाचे छायाचित्रही टाकले होते.

नेयमारला दुखापतीमुळे मायदेशात झालेल्या कोपा अमेरिका स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. मात्र व्हॉट्सअ‍ॅपवरील संभाषणामुळे पोलिसांनी अनेकदा नेयमारची चौकशी केली होती. या प्रकरणाचे कोणतेही पुरावे मिळत नसल्यामुळे पोलिसांनी या महिलेविरोधातच मानहानीचा खटला दाखल केला होता. आता या प्रकरणातून निर्दोष सुटका झाल्याने नेयमारने मोकळा श्वास घेतला असला तरी त्याने याप्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.