भारताचा उदयोन्मुख फलंदाज शुभमन गिलचे मत

हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघातील सलामीच्या स्थानासाठी पृथ्वी शॉ याच्याशी कोणतीही स्पर्धा नाही; परंतु संधी मिळाल्यास ती वाया घालवणार नाही, असे मत भारताचा उदयोन्मुख फलंदाज शुभमन गिलने व्यक्त केले आहे.

वेलिंग्टन येथे २१ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी सलामीच्या स्थानासाठी पृथ्वी भक्कम दावेदार आहे. परंतु न्यूझीलंड ‘अ’ संघाविरुद्ध द्विशतक आणि शतक झळकावून शुभमनने संघ व्यवस्थापनाचे लक्ष वेधले आहे.

‘‘आम्हा दोघांची कारकीर्द एकाच कालखंडात सुरू झाली आहे; परंतु एकमेकांशी कोणतीही स्पर्धा नाही,’’ असे शुभमनने म्हटले आहे. शुभमन आणि पृथ्वी दोघेही २० वर्षांचे असून, २०१८च्या युवा (१९ वर्षांखालील) विश्वविजेतेपद जिंकण्यात दोघांच्या फलंदाजीचा सिंहाचा वाटा होता.

‘‘दोघांनी उपलब्ध सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली आहे. त्यामुळे आता संघ व्यवस्थापन कुणाला संधी देते, ते पाहणे औत्सुक्याचे असेल. कुणालाही संधी मिळाली तरी तो स्वाभाविकपणे त्याचे सोने करण्याचा प्रयत्न करणार,’’ असे शुभमनने सांगितले.

शुभमन गेले सहा आठवडे भारत ‘अ’ संघासह न्यूझीलंड दौऱ्यावर खेळत आहे. आगामी आव्हानाविषयी तो म्हणाला, ‘‘आखूड टप्प्याचे चेंडू टाकून बळी मिळवण्यात न्यूझीलंडचे वेगवान गोलंदाज वाकबदार आहेत. नील व्ॉगनरचा प्रामुख्याने उल्लेख करता येईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या त्यांच्या मागील मालिकेचा आढावा घेतला तरी ही बाब समोर येईल. त्यामुळे आखूड टप्प्याच्या चेंडूंवर बळी न देणे महत्त्वाचे असेल.’’

‘‘वेगवान वारे हा फलंदाजी करताना न्यूझीलंडमध्ये महत्त्वाचा घटक असेल. त्यामुळे चेंडू पूल करणे आणि हूक करणे सोपे नसते. वाऱ्याच्या प्रवाहानुसार गोलंदाज योजना आखतात,’’ असे शुभमनने सांगितले.