ज्यांनी आजपर्यंत फारसा कधी रेल्वे किंवा एस.टी.प्रवासही केलेला नाही अशा मुलांना स्वीडनमधील गोथिया चषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी होण्याची संधी आणि पर्यायाने विमानप्रवास करण्याचे भाग्य लाभणार आहे. एसकेएफ स्पोर्ट्स अकादमीतर्फे पिंपरी-चिंचवड परिसरातील १९ वर्षांखालील मुलांचा संघ १४ ते २० जुलै या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेत भाग घेत आहे.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील मुला-मुलींमधील क्रीडा विकासास चालना देण्यासाठी एसकेएफ कंपनीने कंपनीच्या आवारातच २००५ मध्ये स्पोर्ट्स अकादमी स्थापन केली. या अकादमीत फुटबॉल, क्रिकेट व हॉकी या खेळांच्या प्रशिक्षणास सुरुवात झाली. या अकादमीत प्रशिक्षण घेतलेल्या फुटबॉलपटूंना गतवर्षी पहिल्यांदा गोथिया चषक स्पर्धेत भाग घेण्याची संधी मिळाली. यंदाही त्यांचा संघ गुरुवारी या स्पर्धेसाठी रवाना होत आहे. या संघास राजेंद्र पन्हाळकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या संघात अमानुल्ला गडकरी, शुभम शिंदे, समाधान जगताप (सर्व गोलरक्षक), अक्षय सोनावणे, अनिकेत देवकुळे, अनिकेत पवार, तुषार उडागिरे, सुनील ओताळे, प्रतीक देठे, करण भालेराव, रिझवान शेख, निखिल सोनावणे, अनूप जगताप, शुभम जाधव, अविनाश हिवाळे यांचा समावेश आहे.
हा संघ निवडण्यासाठी ११ ते १६ वर्षे वयोगटातील नैपुण्यवान खेळाडूंची निवड करण्यात आली होती. या खेळाडूंना वर्षभर प्रशिक्षण देण्यात आले आहे. तीस खेळाडूंमधून या खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. गोथिया चषक स्पर्धेत जगातील बहुसंख्य देशांमधील एक हजारपेक्षा जास्त संघ सहभागी होतात. या स्पर्धेनिमित्त व्यावसायिक खेळाडूंकडून काही बहुमोल मार्गदर्शन मिळू शकते.