बीसीसीआयच्या नियोजनावर खंत व्यक्त केल्यानंतर विराट कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली. आता कोहलीने खेळाडूंच्या मानधनाचा मुद्दा उपस्थित केला आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, याच आठवड्यात विराट कोहलीने खेळाडूंच्या मानधनासोबत नफ्यात वाटा मिळावा, अशी मागणी बीसीसीआयकडे केल्याचे समजते. सध्याच्या घडीला भारतीय संघातील अव्वल खेळांडूची वर्षाची कमाई २० कोटी इतकी आहे.

शुक्रवारी बीसीसीआयसोबत होणाऱ्या बैठकीत खेळाडूंच्या मानधनात वाढ करण्यात यावी, अशी मागणी होण्याची शक्यता आहे. भारतीय क्रिकेट मंडळाने टेलिव्हिजन प्रेक्षपणाच्या अधिकाराखाली सप्टेंबरमध्ये एक डिल करण्यात आली आहे. बीसीसीआयने स्टार इंडिया चॅनेलसोबत आयपीएल सामन्यांच्या संदर्भात करार केला. या करारानुसार, २०१८ ते २०२२ पर्यंतचे आयपीएलचे सर्व अधिकार स्टार इंडियाकडे देण्यात आले. यासाठी स्टार इंडियाने तब्बल २. ५ अब्ज इतकी रक्कम मोजली आहे.

भारतीय संघातील खेळाडू आणि बीसीसीआय यांच्यातील करार ३० सप्टेंबरला संपुष्टात आला आहे. त्यामुळे नव्या करारासाठी खेळाडूंकडून मानधन वाढवण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येण्याची शक्यता आहे. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने नाव जाहिर न करण्याच्या अटीवर भारतीय खेळाडूंना मानधन वाढवून हवे असल्याचे म्हटले आहे. कर्णधार विराट कोहली, प्रशिक्षक रवी शास्त्री आणि महेंद्रसिंह धोनी बीसीसीआयसमोर हा मुद्दा उपस्थित करण्याच्या तयारीत आहेत, असे त्यांनी सांगितले. पारदर्शकता नेहमीच चांगली गोष्ट आहे. बीसीसीआय कोणत्याही मुद्दयावर कोहलीसह अन्य खेळाडूंशी चर्चा करण्यासाठी तयार आहे, अशी माहिती देखील त्यांनी दिली आहे.

याशिवाय सर्वोच्च न्यायालयाने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) प्रशासकांचे विनोद राय यांनी देखील खेळाडूंच्या मानधनाचा मुद्दा चर्चेत असल्याच्या चर्चेला दुजोरा दिला आहे. यासंदर्भात खेळाडूंशी दोन टप्प्यात चर्चा होणार असून भारत श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यापुर्वी खेळाडूंशी चर्चा करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.