वृत्तसंस्था, टोक्यो

करोनामुळे टोक्यो ऑलिम्पिकमधून तब्बल १० हजारपेक्षा जास्त स्वयंसेवकांनी माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. टोक्यो संयोजन समितीनेच या बातमीला दुजोरा दिला आहे. तसेच या परिस्थितीत टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करणे धोक्याचे ठरेल, असा इशारा जपानमधील करोना सल्लागारांनी संसदीय समितीला दिला आहे.

टोक्यो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिकसाठी ८० हजार स्वयंसेवकांची फौज तयार करण्यात आली होती. त्यापैकी १० हजारपेक्षा जास्त स्वयंसेवकांनी माघार घेतल्याचे चित्र आहे. करोनाच्या प्रादुर्भावातही ही स्पर्धा आयोजित करत असल्यामुळे आणखीन स्वयंसेवक माघार घेण्याच्या तयारीत आहेत. ‘‘स्वयंसेवकांच्या माघारीचे वृत्त लपवण्यासारखे नाही. करोनामुळे देशातील परिस्थिती गंभीर असताना स्वयंसेवकांनी माघार घेणे स्वाभाविक आहे,’’ असे संयोजन समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तोशिरो मुटो यांनी सांगितले.

ऑलिम्पिकला अवघे ५० दिवस शिल्लक राहिले असताना चाहत्यांचा तसेच स्थानिक नागरिकांचा पाठिंबा मिळवण्यात संयोजकांना अपयश येत आहे. दोन लाख अर्जामधून स्वयंसेवकांची फौज निवडण्यात आली होती. खेळाडूंना मार्गदर्शन करणे तसेच अन्य कामांसाठी मदत म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

दरम्यान, जपानमधील करोनाविषयक सल्लागार शिगेरू ओमी यांनी ही स्पर्धा आयोजित करू नका, असा इशारा जपान सरकारला दिला आहे. संसर्गजन्य रोगतज्ज्ञ ओमी यांनी संसदीय समितीला सांगितले की, ‘‘जपानमध्ये मोठय़ा प्रमाणात करोनाचा फैलाव झाल्यास, त्याला संयोजन समिती कारणीभूत असेल. सद्य परिस्थितीत ऑलिम्पिक स्पर्धा आयोजित करणे योग्य ठरणार नाही.’’

टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा