कसोटी मालिकेत भारताकडून 2-1 ने पराभव स्विकारावा लागल्यानंतर, ऑस्ट्रेलियाने वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी आपली कंबर कसली आहे. 3 वन-डे सामन्यांच्या मालिकेसाठी अरोन फिंचकडे ऑस्ट्रेलियन संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलेलं आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघाने कांगारुंना चारीमुंड्या चीत केलं. मात्र वन-डे मालिकेत भारतीय संघाला कडवी टक्कर देण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघाने रणनिती तयार केली आहे. कर्णधार फिंचने सामन्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये याचे संकेत दिले आहेत.

अवश्य वाचा – हार्दिक-राहुलच्या अडचणीत वाढ, विराट कोहलीने झटकले हात

“गेल्या वर्षात विराट, शिखर आणि रोहित हे तिन्ही फलंदाज 50 पेक्षा जास्त सरासरीने धावा काढत आहेत. यामुळे भारताचं हे त्रिकुट संघातल्या सर्वाधिक धावा काढतंय. यासाठी या तिन्ही फलंदाजांना लवकर माघारी धाडणं हे आमच्यासमोरचं उद्दीष्ट असणार आहे. हे तिन्ही फलंदाज मैदानावर टिकले तर ते खोऱ्याने धावा ओढतात आणि मग त्यांना थांबवणं कठीण जातं.” फिंच पत्रकार परिषदेमध्ये बोलत होता.

अवश्य वाचा – ……तर पुन्हा हातात बॅट घेणार नाही – विराट कोहली

याचसोबत फिंचने भारताच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांपासूनही सावध राहणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. दिनेश कार्तिक, केदार जाधव आणि महेंद्रसिंह धोनी हे फलंदाजही त्यांच्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडल्या आहेत. त्यामुळे पहिल्या तिघांना बाद करण्याच्या नादात या खेळाडूंकडे दुर्लक्ष करणं अयोग्य ठरेल असं फिंच म्हणाला. शनिवारी सिडनीच्या मैदानावर दोन्ही संघांमधला पहिला वन-डे सामना खेळवण्यात येणार आहे.

अवश्य वाचा – Video : जेव्हा 87 वर्षांच्या आजीबाईंची इच्छा धोनी पूर्ण करतो