‘कॉफी विथ करण’ कार्यक्रमात महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या चांगलाच अडचणीत आलेला आहे. क्रिकेट प्रशासकीय समिती हार्दिक आणि लोकेश राहुलवर दोन सामन्यांच्या बंदीची शिक्षा लादण्याच्या तयारीत आहे. या परिस्थितीत हार्दिक आणि राहुलच्या अडचणींमध्ये आणखी भर पडताना दिसत आहे. संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही हार्दिकने केलेल्या वक्तव्यावर आपले हात झटकले आहेत.

अवश्य वाचा – माझा हार्दिक साधाभोळा आहे ! वडिलांकडून पांड्याची पाठराखण

“भारतीय संघाच्या दृष्टीकोनातून एखाद्या प्रसंगात कोणत्याही खेळाडूने केलेल्या आक्षेपार्ह विधानाला आमचा पाठींबा नाहीये. त्यामुळे दोन्ही खेळाडूंनी केलेल्या विधानाशी संघ आमचा काहीही संबंध नाहीये. हे त्या दोन्ही खेळाडूंचं वैय्यक्तीक मत आहे. मला वाटतं दोन्ही खेळाडूंना आपल्याकडून काय चूक झालीये हे समजलं आहे आणि या प्रकरणाचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलेलं आहे.” ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या वन-डे सामन्याआधी विराट पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देत होता.

हार्दिक पांड्याने केलेल्या वक्तव्याची बीसीसीआयनेही गंभीर दखल घेतली आहे. विनोद राय यांच्या अध्यक्षतेखालील क्रिकेट प्रशासकीय समितीने हार्दिक आणि लोकेश राहुलवर दोन सामन्यांच्या बंदीची शिफारस केली आहे. यामुळे पहिल्या सामन्यात दोन्ही खेळाडूंच्या संघातील सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे. दोन्ही खेळाडूंना संघात घ्यायचं की नाही यावर अजुन विचार झालेला नसून, काही गोष्टी या आपल्या हातात नसल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण ठेवणं कठीण असल्याचं सांगत विराटने आपली नाराजी व्यक्त केली.