लाहोर येथील मैदानावर झालेल्या निर्णायक टी-२० सामन्यात विजय मिळवत पाकिस्तान संघानं तीन सामन्याची टी-२० मालिका २-१ च्या फरकानं जिंकली आहे. तिसऱ्या टी-२० सामन्यात पाकिस्तान संघानं दक्षिण आफ्रिकेचा चार गड्यांनी पराभव केला. या विजयासह पाकिस्तान संघानं टी-२० क्रिकेटमध्ये आपल्या १०० व्या विजयाची नोंद केली आहे. टी-२० मध्ये १०० विजय मिळवणारा पाकिस्तानचा पहिलाच संघ ठरला आहे.

पाकिस्तानच्या संघानं १६४ टी-२० सामन्यात १०० सामने जिंकले आहेत. टी-२० मध्ये सर्वाधिक विजयाची नोंद पाकिस्तान संघाच्या नावावर आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या भारतीय संघानं १३७ सामन्यात ८५ विजय संपादन केले आहेत. भारतीय संघाची विजयाची टक्केवारी पाकिस्तान संघापेक्षा चांगली आहे. भारतीय संघानं टी-२० मध्ये ६५.३ टक्के सामने जिंकले आहेत. तर पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या पाकिस्तान संघाची विजयाची टक्केवारी ६३ आहे.

सामनावीर मोहम्मद नवाझ याच्या (२ बळी आणि ११ चेंडूत १८ धावा) अष्टपैलू कामगिरीच्या बळावर पाकिस्तान संघानं निर्णायक सामन्यात चार गडी आणि आठ चेंडू राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड मिलरच्या (नाबाद ८५) धडाकेबाज अर्धशतकामुळे आफ्रिकेनं ८ बाद १६४ धावा केल्या. पाकिस्तान संघानं १८.४ षटकांत विजयी लक्ष्य गाठले.