पाकिस्तानविरुद्धचा दुसरा एकदिवसीय सामना आफ्रिकेने ५ गडी राखून सहज जिंकला. या सामन्यात आफ्रिकेच्या संघाने पूर्ण वर्चस्व राखले. पण या सामन्यात सर्वात जास्त चर्चा झाली ती पाकिस्तान क्रिकेट संघाचा कर्णधार सर्फराज अहमद याने दक्षिण आफ्रिकेच्या अँडील फेलूकव्हायोवर केलेल्या वर्णभेदी वक्तव्याची..

डर्बन येथे झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ २०४ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आला. त्यावेळी आफ्रिकेची अवस्था ५ बाद ८० अशी झाली होती. पण त्यानंतर वॅन डर डसन आणि अँडील फेलूकव्हायो या दोघांनी शेवटर्यंत लढा देत सामना जिंकवला. त्याच्या या चिवट खेळीमुळे कंटाळलेल्या पाकिस्तानच्या कर्णधाराचा मैदानावर तोल सुटला आणि त्याने फेलूकव्हायोवर वर्णभेदी टीका केली.

”ए काळ्या, तुझ्या आईला तू कुठे बसवून आला आहेस? आईला काय प्रार्थना करायला सांगितली आहेस?”, असे वक्तव्य त्याने केले.

त्याचे हे शब्द स्टंपच्या माईकमध्ये रेकॉर्ड झाले आहेत. यामुळे त्याच्यावर प्रचंड टीका होत असून याबाबत त्याच्यावर बंदी घालण्यात यावी, अशी भावना क्रिकेटप्रेमी व्यक्त करत आहेत.