भक्कम पकडी व खोलवर चढाया असा चतुरस्र खेळ करीत पाटणा पायरेट्सने प्रो कबड्डी लीगमध्ये सहावा विजय नोंदवला. त्यांनी दिल्ली दबंग संघावर ४७-३४ अशी मात केली.
शिवछत्रपती क्रीडानगरीत सुरू असलेल्या या स्पर्धेत पाटणा संघाने पूर्वार्धात २०-१४ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात त्यांनी आघाडी आणखीनच वाढवत सहज सामना खिशात टाकला. त्यांना येथील पहिल्या सामन्यात पुणेरी पलटण संघाने ३०-३० असे बरोबरीत रोखले होते. या विजयासह पाटण्याने २८ गुणांसह आघाडीचे स्थान राखले आहे.
सामन्याच्या सुरुवातीला दिल्ली संघाने ५-२ अशी आघाडी घेतली होती, मात्र ५-५ अशा बरोबरीनंतर सामन्यावर पाटणा संघाचीच हुकमत होती. रोहित चौधरीला पूर्वार्धात संधी न देण्याचा निर्णय दिल्ली संघाला खूपच महागात पडला. पाटणा संघाने १५व्या मिनिटाला पहिला लोण नोंदवला. तेथूनच त्यांनी खेळावर पूर्ण नियंत्रण मिळविले. उत्तरार्धात त्यांनी आणखी दोन लोण चढवत आपली आघाडी २० गुणांपर्यंत वाढविली होती. त्यानंतर त्यांच्या खेळात थोडीशी शिथिलता आली. त्याचा फायदा घेत दिल्लीने पहिला लोण चढवण्यात यश मिळवले.
अर्थात हा लोण स्वीकारूनही पाटणा संघाने १७ गुणांची आघाडी घेतली होती. त्यानंतर पाटणा संघाने बचावात्मक धोरण स्वीकारले व ४७-३४ असा विजय मिळवला. त्यांच्या विजयात प्रदीप नरवाल व दीपक नरवाल यांनी अनुक्रमे ११ व १५ गुण नोंदवीत महत्त्वाचा वाटा उचलला.

आजचे सामने
जयपूर वि. तेलगु टायटन्स
पुणेरी पलटण विरुद्ध यू मुंबा
वेळ : रात्री ८.०० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स २,३

 

मिलिंद ढमढेरे