पेप्सिकोच्या प्रमुख इंद्रा नुयी आता क्रिकेट विश्वात पदार्पण करत आहेत. इंद्रा नुयी यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेमध्ये इंडिपेंडन्ट डायरेक्टर (स्वतंत्र संचालक) म्हणून नियुक्ती करण्यात आली असून संचालकपदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला आहेत.

आयसीसीत स्वतंत्र संचालकाची नियुक्ती करण्याचा निर्णय जून २०१७ रोजी घेण्यात आला होता. आयसीसीने या पदावर इंद्रा नुयी यांची निवड केली आहे. जून २०१८ मध्ये त्या पदभार स्वीकारतील. दोन वर्षांसाठी त्या या पदावर असतील. मात्र, त्यांना पुन्हा मुदतवाढ दिली जाण्याची दाट शक्यता आहे. इंद्रा नुयी या पदावर विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला तसेच पहिल्या स्वतंत्र संचालक आहेत. ‘फॉर्च्यून’ मासिकाने जगातील शक्तिशाली महिलांच्या यादीत इंद्रा नुयी यांचा समावेश केला आहे.  इंद्रा नुयी या पेप्सिकोच्या सीईओ असून त्यांच्या अंतर्गत पेप्सिकोची २२ उत्पादने येतात. यात ट्रॉपिकाना, फ्रिटो- ले, पेप्सि- कोला याचा समावेश आहे.

आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी इंद्रा नुयी यांचे स्वागत केले आहे. ते म्हणाले, इंद्रा नुयी यांच्याकडे संचालकपद सोपवताना आनंद होत आहे. आयसीसीतील प्रशासनाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय असल्याचे त्यांनी सांगितले. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेली व्यक्ती या पदावर काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इंद्रा नुयी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘किशोरवयात असताना मला क्रिकेट हा खेळ खूप आवडायचा. मी महाविद्यालयात असताना क्रिकेट खेळले देखील आहे. सांघिक कामगिरी, आदर, आरोग्याचे महत्त्व या सर्व गोष्टी मला या खेळातून शिकायला मिळाल्या. आयसीसीत काम करण्यास मी उत्साहित असून क्रिकेटच्या लोकप्रियतेत भर पाडण्यासाठी नक्कीच प्रयत्न करु, असे त्यांनी सांगितले.

कोण आहेत इंद्रा नुयी?
इंद्रा नुयी यांचा जन्म चेन्नईत झाला असून त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण विज्ञान शाखेत घेतले. यानंतर त्यांनी कोलकात्यातील आयआयएममधून शिक्षण घेतले आणि भारतातच करियरचा श्रीगणेशा केला. भारतात काही वर्ष काम केल्यानंतर त्या पुढील शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. १९९४ मध्ये त्या पेप्सिकोत रुजू झाल्या. २००४ मध्ये त्यांनी कंपनीच्या मुख्य वित्त अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. यानंतर २००६ मध्ये त्यांची कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती झाली. २००७ मध्ये त्यांना प्रतिष्ठेच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.