भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह पाच खेळाडूंनी रेस्तराँमध्ये एका चाहत्याची भेट घेतल्यानंतर जैव-सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले की नाही याची ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडून चौकशी सुरू आहे. अशात कडक विलगीकरणाच्या नियमामुळे पाहुणा भारतीय संघ चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला जाण्यास तयार नसल्याने या कसोटीपुढे संकट ओढवल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना आता क्विन्सलँडच्या आरोग्य मंत्री रोज बेट्स यांनी, ‘जर भारतीय संघाला नियमांचं पालन करायचं नसेल तर त्यांनी क्विन्सलँडला येऊ नये’ अशा शब्दात भारतीय संघाला सुनावलंय.

क्विन्सलँडमध्ये विलगीकरणाचे कठोर नियम असल्याने ब्रिस्बेनऐवजी सिडनीलाच लागोपाठ दोन कसोटी सामने खेळवावेत अशी भारताची मागणी असल्याचं वृत्त ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी दिलं आहे. याबाबत आरोग्य मंत्री रोज बेट्स यांना भारतीय संघाला विलगीकरणातून सूट मिळणार का असा प्रश्न माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर बेट्स यांनी “जर भारतीय संघाला नियमांचं पालन करायचं नसेल तर त्यांनी क्विन्सलँडला येऊ नये” असं म्हटलं. क्विन्सलँडचे क्रीडा मंत्री टिम मेंडर (Tim Mander) यांनीही, “नियम सर्वांसाठी सारखे असून प्रत्येकाला नियमांचं पालन करावं लागेल. जर भरताला नियमांतून सूट हवी असले तर त्यांनी क्विन्सलँडला येऊ नये” असं म्हटलं.

आणखी वाचा- टीम इंडियाला सुनावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ महिला मंत्र्याला वासिम जाफरचं सडेतोड प्रत्युत्तर

दरम्यान, जैव-सुरक्षेच्या नियमांचा भंग केल्यामुळे सक्तीच्या विलगीकरणात असलेले उपकर्णधार रोहित शर्मासह पाच खेळाडू सोमवारी भारतीय क्रिकेट संघासह सोमवारी एकाच विशेष विमानाने तिसऱ्या कसोटीसाठी सिडनीला रवाना होणार आहेत. जैव-सुरक्षित वातावरणाच्या नियमांचा भंग केल्याचा आरोप रोहित, सलामीवीर शुभमन गिल, यष्टिरक्षक ऋषभ पंत, वेगवान गोलंदाज नवदीप सैनी आणि फलंदाज पृथ्वी शॉ यांच्यावर आहे. या प्रकरणी ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडून चौकशी चालू असली तरी पाच खेळाडूंना संघासोबत प्रवासाला मनाई करण्यात आलेली नाही.

तूर्तास, चौथी कसोटी ब्रिस्बेनलाच!
कडक विलगीकरणाच्या नियमामुळे पाहुणा भारतीय संघ ब्रिस्बेनला जाण्यास तयार नसल्याने या कसोटीपुढे संकट ओढवल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी दिले होते. मात्र तूर्तास, चौथी कसोटी ब्रिस्बेनलाच होणार असल्याची ग्वाही सूत्रांनी दिली आहे. चौथा कसोटी सामना १५ जानेवारीपासून सुरू होणार आहे. न्यू साऊथ वेल्स आणि क्विन्सलँड या राज्य शासनांच्या कडक सीमा धोरणांमुळे ही समस्या निर्माण झाली आहे. करोना साथीचा प्रादूर्भाव वाढल्यामुळे न्यू साऊथ वेल्सहून क्विन्सलँडच्या प्रवासास नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. परंतु खेळाडू जैव-सुरक्षित वातावरणात असल्यामुळे त्यांच्यासाठी नियम शिथिल करण्यात आला आहे. ब्रिस्बेनचा सामना हलवण्याबाबत ‘बीसीसीआय’ने अद्याप तरी कोणतीही विनंती ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडे केलेली नाही.