‘जर भारतीय संघाला नियमांचं पालन करायचं नसेल तर त्यांनी क्विन्सलँडला येऊ नये’ अशा शब्दात भारतीय संघाला सुनावणाऱ्या क्विन्सलँडच्या आरोग्य मंत्री रोज बेट्स यांना भारताचा माजी खेळाडू वासिम जाफर याने सडेतोड उत्तर दिलंय. ट्विटरवर एक शानदार मिम शेअर करत जाफरने रोज बेट्स आणि क्विन्सलँडच्या सरकारला मजेशीर उत्तर दिलंय.

भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मासह पाच खेळाडूंनी रेस्तराँमध्ये एका चाहत्याची भेट घेतल्यानंतर जैव-सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाले की नाही याची ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’कडून चौकशी सुरू आहे. अशात कडक विलगीकरणाच्या नियमामुळे पाहुणा भारतीय संघ चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला जाण्यास तयार नसल्याने या कसोटीपुढे संकट ओढवल्याचे वृत्त ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी दिले होते. यावर प्रतिक्रिया देताना क्विन्सलँडच्या आरोग्य मंत्री रोस बेट्स यांनी, ‘जर भारतीय संघाला नियमांचं पालन करायचं नसेल तर त्यांनी क्विन्सलँडला येऊ नये’ अशा शब्दात भारतीय संघाला सुनावलं. क्विन्सलँडमध्ये विलगीकरणाचे कठोर नियम असल्याने ब्रिस्बेनऐवजी सिडनीलाच लागोपाठ दोन कसोटी सामने खेळवावेत अशी भारताची मागणी असल्याचं वृत्त ऑस्ट्रेलियातील माध्यमांनी दिलं आहे. याबाबत आरोग्य मंत्री रोज बेट्स यांना भारतीय संघाला विलगीकरणातून सूट मिळणार का असा प्रश्न माध्यमांनी प्रश्न विचारला. त्यावर बेट्स यांनी “जर भारतीय संघाला नियमांचं पालन करायचं नसेल तर त्यांनी क्विन्सलँडला येऊ नये” असं म्हटलं. क्विन्सलँडचे क्रीडा मंत्री टिम मेंडर (Tim Mander) यांनीही, “नियम सर्वांसाठी सारखे असून प्रत्येकाला नियमांचं पालन करावं लागेल. जर भरताला नियमांतून सूट हवी असले तर त्यांनी क्विन्सलँडला येऊ नये” असं म्हटलं होतं. त्यावर आता वासिम जाफरने मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

आणखी वाचा- ‘नियमांतर्गत खेळा नाहीतर इथे येऊ नका’, क्विन्सलँडच्या सरकारने भारतीय टीमला सुनावलं

‘ऑस्ट्रेलियाच्या मंत्री म्हणतात आमच्या नियमांनुसार खेळा किंवा येऊ नका…’, असं जाफरने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. त्यावर पुढे त्याने, ‘त्यांच्या अशा विधानामुळे भारतीय संघ बॅगमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी टाकून परतण्यासाठी निघालाय’ अशा आशयाचं ट्विट केलं आहे. या ट्विटसोबत जाफरने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा कॅप्शनला साजेसा असा एक फोटो जोडला असून त्यात स्मीत हास्य करणाऱ्या आर्चरने पाठीला बॅग टांगलेली दिसत आहे.


नेटकऱ्यांना वासिम जाफरचं हे उत्तर चांगलंच पसंतीस पडलं असून त्यावर युजर्स अनेक प्रतिक्रिया देत आहेत.