मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि उमेश यादव या गोलंदाजांनी गेल्या काही वर्षांपासून कसोटी आणि मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा दबदबा निर्माण केला आहे. अनेक माजी दिग्गज खेळाडूंनी भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीचं कौतुकही केलंय. मोहम्मद शमीच्या आधीच्या तुलनेत सध्याच्या भारतीय संघात अधिक चांगले जलदगती गोलंदाज आहेत. तो इंडिया टुडेच्या ‘सलाम क्रिकेट २०२०’ या कार्यक्रमात बोलत होता.

“याआधीचा भारतीय संघ आणि आताचा भारतीय संघ यात खूप फरक आहे. याआधी संघात एक किंवा दोन गोलंदाज असायचे जे सातत्याने १४० च्या गतीने गोलंदाजी करायचे. आपल्याला हे मान्य करावं लागेल की याआधी भारतीय संघात फारसे चांगले जलदगती गोलंदाज नव्हते. पण सुदैवाने सध्या भारतीय संघात ५-६ जलदगती गोलंदाज आहेत जे १४० च्या गतीने गोलंदाजी करु शकतात. गती, स्विंग, बाऊन्स अशा सर्व गोष्टी सध्याच्या गोलंदाजांकडे आहेत. आम्ही सर्व एकमेकांचे चांगले मित्र आहोत, आमच्यात एकमेकांची मस्करी सुरु असते.” शमी भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल बोलत होता.

सध्या करोना विषाणूमुळे जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमुळे सर्व भारतीय क्रिकेटपटू घरात आहेत. बीसीसीआयने भारतीय संघाचा प्रस्तावित श्रीलंका आणि झिम्बाब्वे दौरा रद्द केला आहे. सध्या बीसीसीआय आयपीएलचा तेरावा हंगाम आयोजित करण्याच्या प्रयत्नात आहे. शमी आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचं नेतृत्व करतो.