मुंबईकर पृथ्वी शॉला खराब कामगिरीमुळे भारतीय संघातून बाहेरचा रस्ता दाखवला होता. न्यूझीलंडनंतर ऑस्ट्रेलियातही पृथ्वी शॉची बॅट शांत होती. त्यामुळेच त्याला मायदेशात कसोटी मालिकेत डच्चू मिळाला आहे. संघाबाहेर गेल्यानंतर पृथ्वी शॉ यानं आक्रमक फलंदाजी करत निवड समितीला प्रत्त्युत्तर दिलं आहे. विजय हजारे चषकांमध्ये पृथ्वी शॉ यानं द्विशतकी खेळी करण्याचा पराक्रम केला आहे.

विजय हजारे चषकामध्ये आज मुंबईचा सामना पुदुच्चेरीविरोधात सुरु आहे. मुंबईचा कर्णधार पृथ्वी शॉनं नाणेफेक गमावली. पृथ्वी शॉ आणि सुर्यकुमार यादव यांच्या तुफानी फटकेबाजीसमोर पुदुच्चेरीच्या गोलंदाजी कमकुवत भासत होता. पुदुच्चेरी संघानं तब्बल ९ गोलंदाजांचा वापर केला. पण त्याला पृथ्वी शॉला बाद करण्यात अपयश आलं. पृथ्वी शॉ यानं १५२ चेंडूचा सामना करताना नाबाद २२७ धावांची द्विशतकी खेळी केली. या खेळीदरम्यान पृथ्वी शॉ यानं ३१ चौकार ५ षटकार लगावले. पृथ्वी शॉ यानं १४२ व्या चेंडूवर आपलं द्विशतक पूर्ण केलं. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारा पृथ्वी शॉ चौथा भारतीय फलंदाज ठरला आहे. इतकेच नव्हे तर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वयक्तिक सर्वोत्म धावसंख्याही आता पृथ्वीच्या नावावर झाली आहे. पथ्वीनं केरळच्या संजूचा विक्रम मोडीत काढला आहे.

जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडियममध्ये पृथ्वी आणि सुर्यकुमार यादव यांच्या तुफानी फटकेबाजीच्या जोरावर मुंबईनं ५० षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात ४५७ धावांचा डोंगर उभा केला. सुर्यकुमार यादव यानं आक्रमक फटकेबाजी करत शतकी खेळी केली. सुर्यकुमार यादव यानं अवघ्या ५८ चेंडूत १३३ धावांची खेळी केली. सुर्यकुमार यादव यानं या खेळीदरम्यान २२ चौकार आणि चार षटकार लगावले.