प्रो कबड्डी लीग : बेंगळूरु की गुजरात?

बेंगळुरूचे सर्वोत्तम चढाईपटू आणि गुजरातचे तोडीस तोड संरक्षक अशी विजेतेपदासाठीची चुरस रंगणार आहे.

मुंबईत रंगणाऱ्या अंतिम लढतीतून नवा विजेता आज ठरणार

मुंबई : जवळपास तीन महिन्यांच्या द्वंद्वानंतर आता प्रो कबड्डी लीगच्या सहाव्या पर्वाचा शनिवारी मुंबईतील एनएससीआय स्टेडियमवर समारोप होणार आहे. १२ संघांमध्ये रंगलेला हा थरार आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून बेंगळुरू बुल्स आणि गुजरात फॉच्र्युनजायंट्स या दोन बलाढय़ संघांमध्ये आपल्या पहिल्यावहिल्या जेतेपदासाठी अंतिम फेरीचे घमासान युद्ध रंगणार आहे.

२०१७ साली प्रो कबड्डीमध्ये पदार्पण करणाऱ्या गुजरात फॉच्र्युनजायंट्सने सलग दुसऱ्यांदा प्रो कबड्डी लीगची अंतिम फेरी गाठली असून आता त्यांच्यासमोर दुसऱ्या पर्वातील उपविजेत्या बेंगळुरू बुल्सचे आव्हान असणार आहे. मात्र गेल्या वर्षी पाटणा पायरेट्समुळे विजेतेपदाची संधी हुकलेला सुनील कुमारच्या नेतृत्वाखालील गुजरातचा संघ या वेळी विजेतेपदाची कसर भरून काढण्यासाठी सज्ज झाला आहे.

बेंगळुरूचे सर्वोत्तम चढाईपटू आणि गुजरातचे तोडीस तोड संरक्षक अशी विजेतेपदासाठीची चुरस रंगणार आहे. परवेश भैन्सवाल आणि कर्णधार सुनील यांच्या अफलातून पकडींमुळे गुजरातने मोठी झेप घेतली. पहिल्या ‘क्वालिफायर’ लढतीत पराभूत झाल्यानंतर गुजरातने दुसऱ्या ‘क्वालिफायर’ सामन्यात यूपी योद्धाला धूळ चारत दुसऱ्यांदा अंतिम फेरीत मुसंडी मारली. कर्णधार रोहित कुमार आणि पवन शेरावतच्या भेदक चढायांमुळे बेंगळुरूने ब-गटात अव्वल स्थान पटकावले. त्यानंतर पहिल्या ‘क्वालिफायर’ सामन्यात गुजरातलाच ४१-२९ अशी धूळ चारत अंतिम फेरीत प्रवेश केला.

पवन शेरावतने या मोसमा८्न वर्चस्व गाजवत २६० गुण (चढायांचे २४९) मिळवले आहेत. त्याला गेल्या तीन-चार मोसमांत अप्रतिम कामगिरी करणाऱ्या रोहित कुमारच्या (१६१ गुण) चढायांची उत्तम साथ लाभली आहे. त्याचबरोबर महेंद्र सिंगने अफलातून पकडी करत बेंगळुरूच्या यशात मोलाचे योगदान दिले आहे. डाव्या बाजूला संदीपच्या जागी अमित शेरॉनला संधी दिल्यानंतर बेंगळुरूची कामगिरी जास्त सुधारली आहे.

या सामन्यात दोन्ही संघांना विजयासाठी समान संधी आहे. मात्र, गुजरातच्या सुनील आणि परवेश यांना अंतिम फेरीत कामगिरी उंचवावी लागणार आहे. चढायांमध्ये सचिनने चढाईपटूंच्या यादीत अव्वल १० जणांमध्ये स्थान मिळवले आहे. के. प्रपंजन दोन ‘क्वालिफायर’ सामन्यांमध्ये फारसा चमकला नसला तरी गेल्या ११ सामन्यांमध्ये त्याने चढायांचे ८० गुण मिळवले आहेत. त्यामुळे चढायांमध्ये गुजरातची मदार ही सचिन, प्रपंजन यांच्यासह रोहित गुलियावर असणार आहे.

संभाव्य संघ

’ गुजरात फॉच्र्युनजायंट्स : सुनील कुमार (कर्णधार), ऋतुराज कोरवी, के. प्रपंजन, सचिन, परवेश भैंसवाल, रोहित गुलिया, सचिन विठ्ठला.

’ बेंगळुरू बुल्स : रोहित कुमार (कर्णधार), राजूलाल चौधरी, पवन शेरावत, आशीष संगवान, महेंद्र सिंग, सुमित सिंग, अमित शेरॉन.

बेंगळूरु बुल्स वि. गुजरात फॉच्र्युनजायंट्स

सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता ल्ल थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, २

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व pro kabaddi league बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pro kabaddi final gujarat fortunegiants bengaluru bulls eye maiden glory

ताज्या बातम्या